साम्राज्ञी मैथिली तांबे जेव्हा करतात रक्षक दलाचे सारथ्य !
{ महिला दिनी धाडसी निर्णय; सुरक्षेचा नवा अध्याय }
आमदार सत्यजीत तांबे यांचा पुढाकार ; हवेत रंगी बेरंगी फुगे सोडत सुरक्षा मोहिमेचा शुभारंभ
संगमनेर (प्रतिनिधी )
एकेकाळी घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत जात्यावर ओव्या गात दळण दळणारी महिला आणि आज त्याच महिलांचे हात आत्मविश्वासाने डेअरिंग करीत चारचाकीचे स्टेअरिंग सांभाळत शहराच्या सुरक्षेचे नेतृत्व करताना दिसत आहेत. महिलांच्या सामर्थ्याचा हा प्रेरणादायी प्रवास संगमनेर नगरीत प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. महाराष्ट्रात प्रथमच महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचा सुरक्षा उपक्रमाचे सारथ्य करण्याचा मान संगमनेर नगरपालिकेला मिळाला असून या अभिनव संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने संगमनेर नगरपालिकेने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रक्षक दल या उपक्रमाचा शुभारंभ केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात संकुल येथे आयोजित कार्यक्रमात रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून या रक्षक दलाचा विधिवत प्रारंभ करण्यात आला.

शहरात वाढत्या असुरक्षिततेच्या भावना आणि महिलांवरील अन्यायाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला असून आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून व नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून या सुरक्षा उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यावेळी शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा, साम्राज्ञी मैथीली तांबे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या समवेत या उपक्रमाचे सारथ्य स्वीकारत महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलले.

कार्यक्रमाला, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील नान्नज दुमाला येथील कर्तृत्ववान युवती ऋतुजा गायकवाडची जिल्हाधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. मैथीली तांबे यांनी गायकवाड यांच्या यशाचे कौतुक करत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करावे असा प्रेरणादायी संदेश दिला. यानंतर रक्षक दलाची भव्य रॅली शहरातून काढण्यात आली. चारचाकी वाहन आणि दोन बुलेट दुचाकींच्या ताफ्यासह ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरवण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीचे नेतृत्व स्वतः नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी सुरक्षा वाहन चालवत केले.

नागरिकांच्या तात्काळ मदतीसाठी ९०६७२७३२७३ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून या रक्षक दलाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर प्रतिसाद देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. डॉ. मैथिली तांबे यांनी दाखवलेले धाडस, नेतृत्व आणि दूरदृष्टी यामुळे संगमनेर नगरीच्या साम्राज्ञी मैथिली अशी एक नवी ओळख लाभत आहे. या उपक्रमामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी एक सक्षम आणि विश्वासार्ह यंत्रणा उभी राहत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
