आनंदाच्या मुक्त उधळणीत हॅपी स्ट्रीटची मेजवानी ; रोटरी क्लब घेवून येत आहे 'आनंदी रस्ते' उपक्रम खास संगमनेरकरांसाठी
संगमनेर ( प्रतिनिधी )
शहरातील नागरिकांना दैनंदिन ताणतणावातून मुक्तता मिळावी आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने रोटरी क्लब ऑफ संगमनेर तर्फे ‘आनंदी रस्ते’ अर्थात ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष असून, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत स्व. ओंकारनाथ मालपाणी मार्गावर जाणता राजा मैदान या परिसरात हा उपक्रम पार पडणार आहे.
या वेळी नागरिकांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, खेळ, गाणी, गप्पा, गोष्टी तसेच झुंबा डान्सच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सजविलेला रस्ता, रंगीत झाडे, फुगे आणि विविध आकर्षक सजावटींमुळे परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे. ऑर्केस्ट्रा, वासुदेव, नृत्य, लेझीम, मल्लखांब, व्यंगचित्र सादरीकरण आणि झुंबा डान्स आदी कार्यक्रम नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहेत.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी पारंपरिक खेळांसाठी आवश्यक साहित्य जसे की लिंगोरचा, दोरी-उड्या, क्रिकेट साहित्य, व्हॉलीबॉल, गोट्या, टायर, चकरी, फ्लाइंग डिश आदींसह मिमिक्री, जोक्स, वात्रटिका, विडंबन गीते यांसारख्या कला सादर करण्यासाठी साहित्य आणावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘आनंदी रस्ते’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढविणे, कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालविण्याची संधी उपलब्ध करून देणे तसेच पारंपरिक खेळ आणि कलांना प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळून शहरात सकारात्मक आणि निरोगी वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन विश्वनाथ मालाणी, सेक्रेटरी सौरभ म्हाळस तसेच प्रकल्प प्रमुख संकेत काजळे आणि सदस्यांनी केले आहे. नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या आनंदोत्सवाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
