ब्रेकिंग न्यूज :
भारत

धार्मिक कार्यक्रमात हातचलाखीने मोबाईल उडवला; निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून २ लाख २१ हजारावर डल्ला ;

Blog Image
एकूण दृश्ये: 53

धार्मिक कार्यक्रमात हात चलाखीने मोबाईल उडवला; निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून २ लाख २१ हजारावर डल्ला ; 

    संगमनेर ( प्रतिनिधी )

गावात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या गर्दीत संधी साधत एका भामट्याने निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मोबाईल हातचलाखीने लंपास केला आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून तब्बल २ लाख २१ हजार रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील ग्रामीण भागात घडल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे विश्वास ठेवायचा तरी कोणावर ? असा सवाल उपस्थित होत आहे. फिर्यादी नाथा भागा चौधरी (वय ७२) सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी हे शिरसगाव धुपे सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी गेले असताना अज्ञात भामट्याने त्यांचा मोबाईल चोरला. मोबाईल हाती लागताच संबंधित भामट्याने शकल लढवित अत्यंत चलाखीने बँक व्यवहारामध्ये प्रवेश मिळवत २८ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान टप्प्या टप्प्याने त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे, आपला डाव साध्य होताच या भामट्याने चार दिवसांनी सदरचा मोबाईल चौधरी यांच्या घरासमोर आणून ठेवला. त्यामुळे सुरुवातीला मोबाईल हरवल्याची बाब गांभीर्याने न घेतल्याने हा प्रकार उशिरा उघड झाला. दरम्यान,

फिर्यादी चौधरी हे पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातील रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी खात्याची तपासणी केली असता अज्ञात व्यक्तीकडून वारंवार रक्कम काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तातडीने तालुका पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली. हा प्रकार २७ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान घडला असून याबाबत अज्ञाताच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित महाजन यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास अमित महाजन करीत आहेत.

----- Advertisements -----

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin