प्रशासनाच्या नाकर्तेपणावर संतप्त सवाल. जीव जाण्याची वाट पाहताय का ? तहसीलदार कृती कधी करणार ? प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर ओढले ताशेरे
संगमनेर ( प्रतिनिधी )
प्रशासन आपल्या दारी अशी घोषणा देत लोकशाही आणि न्यायाचे गोडवे गाणारे प्रशासन प्रत्यक्षात मात्र अन्यायग्रस्त नागरिकाच्या वेदनांकडे डोळेझाक करत असल्याचे धक्कादायक आणि संतापजनक वास्तव संगमनेरमध्ये समोर आले आहे. वडगाव पान येथील अतिक्रमित जमिनीचा ताबा मिळावा म्हणून वर्षानुवर्षे प्रशासनाच्या पायऱ्या झिजवणारे गणेश रासने यांनी थेट प्रशासनाच्या नाकर्तेपणा विरोधात रणशिंग फुंकले आहे.
वेळोवेळी पाठपुरावा, कागदपत्रे, आदेश आणि मंजुरी असूनही प्रत्यक्ष कारवाई शून्य असल्याचे ते म्हणाले. २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे रासने यांनी कुटुंबासह उपोषण सुरू केले. मात्र त्याच वेळी झेंडावंदन, भाषणात मशगुल असलेल्या अधिकाऱ्यांना न्यायासाठी बसलेल्या एका नागरिकाची साधी भेट घेण्याचीही गरज वाटली नाही. ही बाब केवळ दुर्लक्ष नव्हे, तर लोकशाहीची उघड थट्टा असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.
अनेक नागरिक उद्योजकांनी या ठिकाणी रासने यांची भेटही घेतली. रासने यांच्या मालकीची स.नं. १३/१ (०.६१ आर) जमीन असून त्यातील तब्बल १७ गुंठे क्षेत्रावर जनार्दन गायकवाड यांनी अतिक्रमण केल्याचे अधिकृत मोजणीत स्पष्ट झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याचे लेखी आदेश दिले आहेत, पोलिस बंदोबस्त मंजूर आहे, पंचनामे पूर्ण झाले आहेत. मग प्रश्न एकच उरतो, कारवाई का होत नाही ? आदेश फाईलमध्ये आणि न्याय केवळ कागदावरच का ? असा रोखठोक सवाल रासने यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाकडून केवळ उडवा उडवीची उत्तरे दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण असताना महसूल अधिकारी अतिक्रमणधारकांवर हातोडा टाकण्याचे धाडस का दाखवत नाहीत ? यामागे नेमका कुणाचा दबाव आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
प्रजासत्ताक दिनीही उपोषणाची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या रासने यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, उपोषण करूनही न्याय मिळत नसेल, तर आता संघर्षाची दिशा बदलून हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. न्यायासाठी माणूस उपोषणाला बसतो, तेव्हा प्रशासन गप्प का बसते? जीव गेला तरच हालचाल होणार का? असा सडेतोड सवाल उपस्थित करत, येत्या काही दिवसांत उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराच रासने यांनी दिला आहे.

