माफ करणार नाही ! अपूर्ण कामे, ठेकेदारांवर थेट कारवाईचा इशारा ; कामे रखडली, टाका ब्लॅकलिस्टला; आमदार अमोल खताळ यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला खमक्या भाषेत निर्देश, ठेकेदारांच्या मक्तेदारीवर घणाघात
संगमनेर (प्रतिनिधी)
तालुक्यात सत्तांतरानंतर काही ठेकेदारांनी जाणीवपूर्वक विकासकामे अपूर्ण ठेवून जनतेची गैरसोय आणि लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा कुटिल डाव रचल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. वेळेत आणि दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांना यापुढे कोणतीही सूट दिली जाणार नाही. कामे रखडवली, अपूर्ण ठेवली किंवा निकृष्ट दर्जाची केली, तर थेट काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करा, असे ठणकावून सांगत आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेताना आमदार खताळ यांनी ठेकेदारांच्या मक्तेदारीवर घणाघाती शब्दांत प्रहार केला. एकाच ठेकेदाराकडे चार पाच कामे देऊन ती वर्षानुवर्षे रखडवली जात असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट कामामुळे वारंवार खड्डे पडत असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, हे गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाकडे जाणारा निळवंडे जांभुळवाडी फाटा, वडगावपान फाटा तळेगाव अकोले रस्ता, शहरातील एलआयसी इमारतीजवळील रस्ता तसेच तालुक्यातील इतर प्रमुख रस्त्यांची अवस्था पावसामुळे विदारक झाली आहे. निधी उपलब्ध असतानाही कामे वेळेत पूर्ण न होणे ही ठेकेदारांची बेजबाबदार वृत्ती असल्याचे आमदार खताळ यांनी ठासून सांगितले. महायुती सरकारच्या माध्यमातून रस्त्यांसाठी निधी देण्यात आलेला असताना, कामे रखडवून जनतेला त्रास देणे खपवून घेतले जाणार नाही. अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने, दर्जेदार साहित्य वापरून पूर्ण करून घ्यावीत. जिथे अडचणी येतील, तिथे लोकप्रतिनिधी म्हणून आपण ठामपणे अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपविभागीय अभियंता काशिनाथ गुंजाळ, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे, पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत चव्हाण यांच्यासह दोन्ही विभागांचे उपअभियंते उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांचा सविस्तर अहवाल तयार करा. ज्यांच्या रकमा शासनाकडे जमा आहेत, त्या कामांच्या नव्याने निविदा काढून रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा. लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे खताळ म्हणाले.
