शिस्त, तत्परता आणि जनतेचा विश्वास हेच पोलिसांचे खरे बळ : पोलीस अधीक्षक घार्गे
{ पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण; फिर्यादीसह नागरिकांशी साधला थेट संवाद }

संगमनेर (भारत रेघाटे)
संगमनेर शहर संवेदनशील असल्याने येथे प्रत्येक क्षणी सतर्कता राखणे अत्यावश्यक आहे. पुरेशा मनुष्यबळाचा अभाव असल्यास अगदी छोटाही प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे सक्षम पोलीस बंदोबस्त, कामातील तत्परता आणि गुन्ह्यांचा प्रभावी तपास व उकल यावर विशेष भर देणे गरजेचे आहे, असे ठाम मत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केले. बुधवार (दि. ४) रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या वार्षिक निरीक्षणासाठी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध नोंदवही, गुन्हे रजिस्टर, प्रतिबंधात्मक कारवाईची कागदपत्रे, प्रलंबित गुन्ह्यांची स्थिती तसेच तपासासाठी उपलब्ध असलेली उपकरणे बारकाईने तपासली. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास वेगाने, सातत्याने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण झाला पाहिजे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

निरीक्षणा दरम्यान पोलीस ठाण्याची स्वच्छता, फाईल व रजिस्टरची सुयोग्य मांडणी, नागरिकांशी संवादाची पद्धत आणि तक्रारींवर दिला जाणारा तत्काळ प्रतिसाद यावर त्यांनी विशेष भर दिला. शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत बोलताना घार्गे म्हणाले की, पुरेसे पोलीस बळ कायमस्वरूपी तैनात असणे आवश्यक आहे, जेणेकरून उद्भवणाऱ्या समस्या तात्काळ हाताळता येतील. दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचे योग्य डिटेक्शन व प्रभावी तपास झाला पाहिजे. यासंदर्भात पोलीस यंत्रणेला पारदर्शक मार्गदर्शन दिले जात आहे. अनेक गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे रोखता येतात. विशेषतः स्ट्रीक क्राईम रोखण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी आपुलकीने व संवेदनशीलतेने वागले गेले पाहिजे असे सांगत त्यांनी उपस्थित फिर्यादींशी थेट संवाद साधला.

पोलीस कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, ताणतणाव, कर्मचारी कमतरता, बदलीचे प्रश्न आणि वाढता बंदोबस्त यांचा सविस्तर आढावा घेत. तुम्हीही या समाजाचाच भाग आहात. तुमचे मनोबल आणि मानसिक स्वास्थ्य टिकणे तितकेच महत्त्वाचे आहे असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक कारवाई, संवेदनशील भागात नियमित पेट्रोलिंग, तसेच सुरक्षितता संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि पोलिसांची दृश्य उपस्थिती वाढवणे या उपाययोजना अधिक प्रभावी ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कर्तव्य बजावत असताना महिला पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत विशेष दक्षता घ्यावी. रात्रीची ड्युटी, बंदोबस्त, जमाव नियंत्रण किंवा संवेदनशील ठिकाणी काम करताना नियमांचे काटेकोर पालन करावे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकाऱ्यांसोबतच पुढाकार घ्यावा असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या वेळी उत्कृष्ट व कर्तव्यदक्ष कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रकरणे प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकोडे, इम्रान खान, फरहानाज पटेल तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. निरीक्षणावेळी पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.
