ब्रेकिंग न्यूज :
भारत

महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक,ऐतिहासिक परंपरेचा जिवंत वारसा ; संगमनेरच्या होल्लम काठीला ७९० वर्षांची अखंड परंपरा : मानाची उजवी काठी जेजुरीकडे प्रस्थान

Blog Image
एकूण दृश्ये: 22

महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरेचा जिवंत वारसा,  संगमनेरच्या होल्लम काठीला ७९० वर्षांची अखंड परंपरा : मानाची उजवी काठी जेजुरीकडे प्रस्थान

      संगमनेर ( भारत रेघाटे )

 खंडोबाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीला संगमनेरच्या होल्लम राजाच्या मानाच्या काठीची परंपरा तब्बल ७९० वर्षांपासून अखंड सुरू आहे. १२३७ सालापासून संगमनेरच्या होल्लम राजाची ही पहिली मानाची काठी दरवर्षी जेजुरीला जात असून, या काठीला काठी शिखरेच्या सोहळ्यात उजव्या काठीचा मान दिला जातो. यावर्षीही ही ऐतिहासिक काठी संगमनेरच्या तेलीखुंट होल्लम मंदिरातून गाजत वाजत मिरवणूक निघत लाभ देत जेजुरीकडे रवाना झाली. यानिमित्त संगमनेर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांनी फुले उधळून स्वागत केले तसेच भक्तगणांना भंडारदऱ्याचा वाटप करण्यात आले. संगमनेर खुर्द येथील मारुती मंदिरात ही काठी मुक्कामी ठेवून रात्री बारा वाजता विधीपूर्वक जेजुरीकडे प्रस्थान झाले.

ही काठी  १ फेब्रुवारी  माघ पौर्णिमाच्या पूर्व संध्येला जेजुरीत मुक्कामी पोहोचणार असून दोन तारखेला काठी शिखरेचा मुख्य सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. संगमनेरहूनच दरवर्षी सुमारे २५ ते ३० हजार भाविक पायी व वाहनांनी जेजुरीकडे दर्शनासाठी जातात. जेजुरी येथे ६० ते ६५ काठ्या येतात. त्यापैकी तीन काठ्यांना विशेष मान आहे. त्यामध्ये संगमनेरची होल्लम काठी (उजवा मान), मोरगाव सुपे येथील खैरे पाटलांची काठी (डावा मान) आणि तिसरी काठी जेजुरी येथे स्थायिक असलेली अहिल्याबाई होळकरांची काठी आहे. उजवा डावा मान यावर वाद होऊ नये म्हणून होळकरांची काठी मध्यस्थीची भूमिका बजावते. जेजुरी येथील खंडोबाची तीन लिंगे खंडोबा, म्हाळसा जवळ होल्लमची आणि बानुबाई जवळ खैरे पाटलाची काठी शिखरी लागते मानाच्या काठीला होल्लम राजाच्या काठीस विशेष महत्त्व दिले जाते. शिवाजी महाराजांच्या काळातील तीन सर्वश्रेष्ठ शहरांपैकी संगमनेर हे एक ऐतिहासिक शहर मानले जाते.

संगमनेरची ही होलम काठी जेजुरीला मान घेण्यासाठी जात असताना अंभोरकर (देशमुख) वाडा आणि बाळासाहेब पाटील यांच्या वाड्यात अंभोरकरवाड्यात काठीचे स्वागत केले जाते. तेथे तळी-भंडारा, आरती व दर्शनाचा सोहळा पार पडतो. परतीच्या प्रवासात ५ फेब्रुवारी रोजी देवगड येथील खंडोबा मंदिरात सकाळी या काठीचे आगमन होते. भाविक मोठ्या श्रद्धेने काठी दर्शन घेतात, प्रसाद, भंडारा व आरतीचा लाभ घेतात. त्यानंतर ही काठी पुन्हा संगमनेरला मुक्कामी येते. संगमनेर ते जेजुरी आणि जेजुरी ते संगमनेर असा हा पवित्र प्रवास गेली ७९० वर्षे अखंड सुरू असून, महाराष्ट्राच्या धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा जिवंत वारसा ठरला आहे.

----- Advertisements -----

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक