तमाशावीर श्री रघुवीराना पद्मश्री ; म्हणाले, हा सन्मान तमाशा सृष्टीचा गौरव ; ‘आज आई पाहिजे होती ! लोककलावंत खेडकर
संगमनेर ( प्रतिनिधी )
विषमुक्त धान्य निर्मितीच्या कार्यासाठी बीजमाता राहीबाई पोपेरे (२०२०), सामाजिक योगदानासाठी पोपटराव पवार आणि क्रीडा क्षेत्रातील झहीर खान यांना यापूर्वी पद्मश्री मिळाल्यानंतर, तब्बल पाच वर्षांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कलाक्षेत्रातील पहिला मानाचा सन्मान तमाशावीर कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांना मिळाल्याने कलाभूमी ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुरस्काराची घोषणा होताच भावूक होत रघुभाऊ म्हणाले, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, तर संपूर्ण तमाशा सृष्टीचा गौरव आहे. हा सन्मान पाहण्यासाठी आई आज पाहिजे होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

खेडकर यांची त्यांच्या आई कांताबाई सातारकर आणि वडील तुकाराम खेडकर यांनी घडवलेली समृद्ध सांस्कृतिक परंपराही आहे. तुकाराम खेडकर हे कोकणातील खेड येथील, तर कांताबाई सातारकर या साताऱ्यातील सुप्रसिद्ध तमाशा घराण्यातील. या दोन घराण्यांच्या संगमातून निर्माण झालेली परंपरा आज तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचली आहे. कोकणातील खेड हे तुकाराम खेडकर यांचे मूळ गाव. निसर्गसंपन्न परिसर, कष्टाळू जीवनशैली आणि लोककलेची परंपरा यातून तुकाराम खेडकर घडले. आपल्या आवाजातील ताकद, सहज अभिनय आणि विनोदी शैलीमुळे त्यांनी तमाशा सृष्टीत लवकरच मोठे स्थान मिळवले. संगमनेरमध्ये कांताबाईंनी पुन्हा स्वतःचा तमाशा फड सुरू केला. गावोगाव प्रयोग, यात्रांतील कार्यक्रम, सामाजिक सोहळे यामधून त्यांचे नाव पुन्हा प्रसिद्ध झाले. सण उत्सव, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रमात त्या हमखास दिसू लागल्या. त्यामुळे त्या केवळ कलाकार न राहता, संगमनेरच्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनल्या. गणराज्य दिनानिमित्त २६ जानेवारीला लोककलावंत रघुवीर खेडकर त्यांना पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
