ब्रेकिंग न्यूज :
भारत

अतिक्रमित जागेचा ताबा देण्यास दिरंगाई; प्रशासनाला थेट आव्हान ,गणेश रासने 26 जानेवारीला कुटुंबासह बसणार उपोषणास

Blog Image
एकूण दृश्ये: 153

 

अतिक्रमित जागेचा ताबा देण्यात दिरंगाई; प्रशासनाला थेट आव्हान; अखेर गणेश रासने यांचे ठरले, 26 जानेवारीला कुटुंबासह उपोषणास बसणे

       संगमनेर ( प्रतिनिधी )

वडगाव पान येथील अतिक्रमण प्रकरणात सक्षम महसूल अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश, शासकीय मोजणी, पोलिस बंदोबस्त व पंचनामे होऊनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने प्रशासनाची निष्क्रियता उघड झाली आहे. आदेशांची सर्रास पायमल्ली होत असताना पीडित नागरिकाला न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचा गंभीर आरोप तक्रारदार गणेश रासने यांनी केला आहे. प्रशासन स्तरावर कृती न झाल्याने तसेच ताबा न दिल्याने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सहकार महर्षी क्रीडा संकुलासमोर कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रासने यांनी दिला आहे.

रासने यांच्या मालकीची वडगाव पान येथील स.नं. 13/1 (क्षेत्र 0.61 आर) या जमिनीतील पूर्वेकडील सुमारे 17 आर क्षेत्रावर जनार्दन सहादू गायकवाड व इतरांनी अतिक्रमण केल्याचे अधिकृत मोजणीत स्पष्ट झाले आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून ताबा देण्याचे ठोस आदेश दिले असून पोलिस बंदोबस्तही उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र तरीही समनापूर येथील मंडळाधिकारी आंबरे प्रत्यक्ष कारवाई टाळत असल्याचा आरोप रासने यांनी केला आहे. तर तहसीलदारांकडूनही केवळ उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्व कायदेशीर अडथळे दूर होऊनही, वारंवार पाठपुरावा व नोटिसा देऊनही आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे. न्यायासाठी झगडूनही मला मानसिक छळ सहन करावा लागत आहे. आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असा इशारा देत प्रशासनाने अतिक्रमण हटवले नसल्याने प्रजासत्ताक दिनी कुटुंबासमवेत उपोषणास बसणार असल्याचे गणेश रासने यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

 

----- Advertisements -----

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin