आमदारांनो इकडे लक्ष द्याल का ? वाहतुकीचा बोजवारा उडवणारी व्यवस्था : नागरिक सिग्नल तोडत नाहीत, नियोजनच ठरतय सपशेल अपयशी!
संगमनेर : ( भारत रेघाटे )
हायटेक बस स्थानकासमोरील वाहतूक पाहिली की एकच प्रश्न पडतो , इथे कुणी तर विचार 'न' करून काही केलंय का ? कारण हा परिसर म्हणजे नियोजनशून्य कारभाराचा जिवंत नमुना बनला आहे. शिस्त, नियम, सुव्यवस्था हे शब्द इथे फक्त मनात, चर्चेत नि कागदावरच शोभून दिसतात; प्रत्यक्षात मात्र रोजचा अनुभव म्हणजे बेशिस्त उल्लंघनाचा नित्याचा तमाशा!

अनेकजण येतात बेजबाबदारपणे गाडी लावून निघून जातात. आपण कुठे आणि कशी गाडी लावतो याचे भानच अनेक वाहनचालकांना उरलेले नाही. रस्ता, फूटपाथ, वळणे, प्रवेशमार्ग यावर बिनधास्तपणे मोठमोठी वाहने आडवी उभी केली जातात. परिणामी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चालायचे कुठून, प्रवाशांनी मार्ग काढायचा कसा ? इतर वाहनांनी पुढे जायचे कसे ? असा संतापजनक प्रश्न उभा राहतो. ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर सार्वजनिक जागेवरची मनमानी आणि सरळसरळ अन्याय असून, प्रशासन आणि वाहनचालक दोघांनीही याबाबत गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे तरच हा प्रश्न सुटेल.
बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस, शहरातील दुचाकी, तीनचाकी, चार चाकी, पादचारी, मालवाहू ट्रक, जड वाहने, आणि त्यातच भरातभर नाशिक अकोले दिशेची अवजड वाहतूक या सगळ्यांना अवघ्या काही मीटरमध्ये दोन सिग्नल देऊन तसे बस स्थानकात जाणारे षटमार्ग, नाल्यावरील अतिक्रमण या चौकाला जणू कोंडीच्या खाईत लोटलेले दिसून आहे. एका सिग्नलला कायम कुलूप, तर दुसरा सिग्नल बेधुंद वाहतुकीच्या गर्तेत गुदमरलेला! दोन्ही सिग्नलमधील अंतर इतके कमी की सिग्नल टायमर नीट लागूच शकत नसल्याने वाहन चालकांचा अंदाज चुकतोय खरा, वेळेचे गणित बिघडते आणि शेवटी सिग्नल मोडणे, अथवा विरूध्द दिशेचा वापर हाच पर्याय अशी मानसिकता वाहनचालकांची तयार झाली. या व्यवस्थेला जबाबदार कोण ? दोन्ही आमदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, बेशिस्त झालेली वाहतूक ! मग दोष कुणाचा ? नागरिकांचा की या नियोजनाच्या ठेकेदारांचा ?

बसस्थानकासमोर कमी अंतरात ये जा ही सुरळीत व्हावी, प्रवासी आणि वाहनांचा ताफा शिस्तबद्ध राहावा, या उद्देशाने सहा मार्गांची (षटमार्ग) रचना करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या मार्गांचा वापर नियोजनाऐवजी मनमानीसाठीच अधिक होताना दिसतो. कुणीही कुठूनही येतो, पर्वा न करता कसेही वळतो, आणि वाहन कुठेही उभे करून निघून जातो. बसस्थानकासमोर तीन मार्ग आणि याच बाजूने सिग्नलपर्यंत आणखी तीन मार्ग असूनही प्रवेश, निर्गमन आणि पार्किंग याबाबत स्पष्ट नियमांची अंमलबजावणी नसल्याने हे सहा मार्ग वाहतुकीचा श्वास मोकळा करण्याऐवजी अडथळ्यांचे जाळे बनले आहेत. याचा थेट फटका प्रवाशांना बसतो. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा राहत नाही, दुचाकी वाहने चारचाकी गाड्या एकमेकांच्या आड येतात, आणि काही मिनिटांतच संपूर्ण परिसर बंद होतो. प्रत्यक्षात शिस्त, नियंत्रण आणि देखरेख नसल्याने बोजवारा उडाला. तातडीने स्पष्ट लेनमार्किंग, नो पार्किंग, केली तरच हे षटमार्ग वाहतुकीसाठी उपयोगी ठरतील;

वाहनांची बेसुमार वाढ, अरुंद रस्ते आणि बसस्थानका समोरील गोंधळलेल्या मार्गाची रचना. हे सगळे नेमके दुरूस्त करणार कोण ? कुणाच्या सुपीक डोक्यातून मार्ग निघेल ? रस्त्यावरच मोठा नाला, त्यावर ठाण मांडून बसलेले व्यावसायिक, मोडकळीस आलेला विद्युत आणि सिग्नल खांब, अर्धवट बिघडलेले सिग्नल ,अवाढव्य कोपऱ्यासह अगणिक अडथळे या सगळ्यांनी मिळून वाहतुकीचा अक्षरशः गळा दाबला आहे. इथे वाहन चालक, पादचारी, रस्त्यावर चालत नाही, तर जीव मुठीत धरून कसरत करतो. नाशिक कडून अकोल्याकडे, बस स्थानकाकडे आणि शहरात जाणारे चालक मनमानी करत उलटसुलट मार्ग वापरताना दिसतात.

बस स्थानकातून बाहेर पडताच मधोमध वाहनांचा घोळका जणू संपूर्ण रस्ताच गिळंकृत केलेला. ही गैरसोय होय. दत्त मंदिरासमोरील कॉर्नर आणि अकोले कडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळण अनावश्यकरीत्या रुंद व अडथळादायक ठरत असून, याच ठिकाणी वाहतूक अडकून गोंधळ वाढतो. , या कॉर्नरचे रेडियस रिडक्शन, स्पष्ट लेनमार्किंगची कठोर अंमलबजावणी केली, तर वाहतुकीत तात्काळ आणि ठोस सुधारणा होईल.

रिक्षाचालकांची अवस्था तर ना पुढे, ना मागे अशीच. बाजूला पडलेला वीटाची रास अस्ताव्यस्त राडारोडा, पर्याय नाही म्हणून गर्दीतच उभे राहणे भाग. दोन मोठे कॉर्नर असूनही तिथे राडारोडा पडलेला. रिक्षाचालकांची रोजची कुचंबणा कुणाला दिसतेय का, की तीही दुर्लक्षित ?दुभाजकांची रचना म्हणजे तर निव्वळ थट्टा! मध्ये प्रचंड अंतर, तर अकोले दिशेकडे दुभाजकच गायब. परिणामी संपूर्ण रस्ता जो मिळेल तो आपला या तत्त्वावर ताब्यात घेतला जातो. त्या दिशेने वाहन चालवताना चालक दमतो, वैतागतो आणि शेवटी संताप व्यक्त करतो. अशा बेशिस्त कारभारात सिग्नलचा फज्जा उडणे हे साहजिकच नव्हे का !
पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी असूनही या अव्यवस्थेला वळण लावण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र कायमचेच. नियम आहेत, पण रस्ता नियमांपेक्षा मोठा झालाय हीच वस्तुस्थिती बस स्थानक समोरील रस्त्याची आणि सिग्नलची वर्दळीची झालेली आहे.

अपना भिडू, बच्चुभाऊ कडू असा संदेश देणा-या मालवाहू ट्रकने याच सिग्नलवर दम तोडल्याने तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली होती. भरातभर या मालवाहतूक गाडीला छोटा मालवाहू टेम्पो चांगलाच भिडला. हे बघून हसू का रडू अशी काही वाहनचालकांची अवस्था झाली होती छोटे रस्ते आणि त्यात वाहतुकीला अजूनच खोळंबून ठेवत नागरिक आणि जमेल तसे वाहन चालक आणि कसरत करत आपला मार्ग पुढे रेटला त्याच दरम्यान आलेली पोकलेन अकोले रस्तावर नसलेले दूभाजक जणू काही रस्ताच नाही या रस्त्याला वेगळ्या वळणावर नेणारा हा चौक कधी सुटकेचा निस्वास टाकेल असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
उपाय समोरच, पण इच्छाशक्ती कुठे ?
बसस्थानकासमोरील रस्ता इन आऊट पद्धतीने स्पष्ट करा, ये जा साठी स्वतंत्र पर्यायी छोटा मार्ग तयार करा, दुभाजक योग्य ठिकाणी बंद करा, कॉर्नरवरील अतिक्रमण तात्काळ हटवा, इतके केल्यास अर्ध्या पैकी प्रश्न सुटू शकतात. पण व्यवस्थापनाला ते करायची तयारीच नाही, हीच खरी शोकांतिका! नागरिकांच्या मनात प्रश्नांचा भडका उडतोय. या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? आमदार, नगरपालिका, बांधकाम विभाग,नेमके सूत्र कुणाच्या हातात आहे? काम झाले की श्रेयासाठी पुढे येणारे, पण समस्या आली की गप्प बसणारे. असा हा कारभार नागरिक किती दिवस सहन करायचा ?

दर्शनीबाजूवर षटमार्गाची गरज आहे का ?
बसस्थानक परिसरातील पार्किंग गोंधळ गाडी लावणे मुश्किल, त्यापेक्षा चालणे ही मुश्किल.चारचाकी,दुचाकी वाहनांची मनमानी, अक्षरशः कोंडी, अस्ताव्यस्त पार्किंग आणि ‘इन-आऊट’ची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने षटमार्गाची गरज आहे का ? चारचाकीनी गिळंकृत केली पार्किंगने हा परिसर दिवसभर डोक्याला ताण देणारा बनला असून कॉर्नरचा वापर उपयोगात आणता येणार नाही का ?
कमी जागेत शिस्तबद्ध पार्किंग करता येणार नाही का ?
दुचाकींसाठी स्वतंत्र रांगा, चारचाकींसाठी निश्चित प्रवेश हे सगळे उपाय नवे नाहीत. मग इथेच ते का अंमलात येत नाहीत? इन-आऊटची दिशा स्पष्ट नसताना, फलक नसताना, कर्मचारी नसताना नागरिक तरी काय करणार ? आज नाही तर उद्या मार्ग काढावाच लागणार असे म्हणत प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. पण वाट का पाहतोय? अपघात होण्याची? एखाद्या जीवाची किंमत मोजल्यानंतरच निर्णय होणार का ?
आता प्रश्न निकाली काढायलाच हवा !
बसस्थानक परिसरात तात्काळ शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था लागू करा, इन आऊट वेगळे करा, वाहतूक कर्मचारी तैनात करा. नागरिकांचा संयम संपत चालला आहे. बसस्थानक हे सुविधा केंद्र आहे, वाहतुकीचा नरक नव्हे! आता तरी प्रशासन जागे होणार का, की गोंधळालाच रोजची सवय मानणार ? असा प्रश्न नागरिक आपल्या स्वमनालाच विचारत आहेत.

१५ ऑगस्टदरम्यान नवीन बसेस दाखल झाल्यावर शहरात आमदार अमोल खताळ यांनी फेरफटका मारला खरा, महामंडळाची बस सुद्धा चालवली. फेरफटका मारून वाहतूक सुरळीत करण्याचे दिलेले आश्वासन अजूनही कागदावरच आहे का ? की ते आश्वासन अजूनही बसमध्येच बसलेले आहे ? असा थेट सवाल आता नागरिक आमदार अमोल खताळ यांना विचारत आहेत. याबाबत त्यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की संबंधित विभागाने याकडे लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा.

“२.०” कमाल कधी दाखवणार ?
या घाबरगुंडीत भर म्हणून अलीकडेच सिग्नलवर तांत्रिक बिघाडामुळे मोठा मालवाहू ट्रक तब्बल दोन तास बंद पडला. दोन तास वाहतूक ठप्प, वाहनचालकांचा संयम सुटला, मनस्तापाचा कडेलोट झाला. रस्ते, शहर आणि वाहतूक या तिन्हींचा मेळ कुठेच दिसत नव्हता. अखेर प्रश्न एकच. आमदारांनो, इकडे लक्ष द्याल का? संगमनेर बस स्थानका समोरील वाहतुकीचा हा पेच कधी सुटणार ?की सिग्नल, कोंडी आणि रोजची डोकेदुखी हेच आता संगमनेरकरांचे कायमचे नशीब ठरणार ?
याबाबत आमदार सत्यजित तांबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शहरातील समस्या आणि जाहीरनामा हा अजिंठा आपल्या नजरेसमोर आहे त्यानुसार शहराला शिस्त लावण्याचे काम सुरू आहे परंतु याबाबत आपण मंगळवारी परिसराची पाहणी करणार असून हातावरच्या माणसाचाही आपण विचार करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस आर वर्पे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ठराविक कामापेक्षा त्यांच्याकडे तांत्रिक कामाचा प्रचंड लोड असल्याचा ताण दिसून आल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. फोन करूनही त्यांच्याकडून याबाबत कोणते ही उत्तर मिळाले नाही.
