हायटेक बसस्थानकची कोण घेणार टेक केअर ? पहिले तोडले जात असत सिग्नल ;आता तुटतात हातपाय अन् तोडल्या जातात गाड्या ! गड्या आणि गाड्यांना घ्या पट्यात ; चौघात वाढतायेत अपघात
संगमनेर { भारत रेघाटे }
शहराच्या मध्यभागी उभे असलेले तथाकथित हायटेक बसस्थानक आता प्रवाशांसाठी सुविधा नसून थेट धोक्याचे केंद्र बनले आहे. गाजावाजा मोठा, चोरट्यांचा धुमाकूळ,,पण वास्तव त्यापेक्षा भयंकर! अरुंद रस्ते, पार्किंगचा शून्य कारभार, वाढती वाहनसंख्या, त्यावर प्रशासनाची बेफिकिरी. या सगळ्यांमध्ये वर्दळीचे कॉकटेल. रोज अपघातांना जन्म देतोय. दोनच दिवसांपूर्वीच या प्रश्नावर लक्ष वेधत अनेक विषय नजरेसमोर ठेवून मांडले गेले होते. आमदार, प्रशासन, बांधकाम विभाग आदि अधिकारी सगळ्यांना इशारा दिला गेला. पण कुणीच गांभीर्य घेतले नाही. परिणाम काय ? एका दुचाकीने पिक -अप घेत थेट पिकपला धडकत हातपाय घासून घेत पिक-अप ठोकली. वर्दळीत बघ्याची भाऊगर्दी जमली, वाहनांचे नुकसान तर झाले . नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीत पुन्हा भर. जणू हा प्रसंग व्यवस्थेच्या अपयशाची थेट पावतीच होती ती.
फुटपाथ नव्हे, दुकानदारांचे अड्डे!
बसस्थानकाच्या बाहेर पडताच दोन्ही बाजूंना फुटपाथ गिळंकृत झाला, पाथच गायब झाला फूट ठेवायला फुटभर जागा शिल्लक राहिली नाही. प्रवाशांना नीट चालायलाही जागा नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी सगळेच जीव मुठीत घेऊन वाट काढतात. बस स्थानकाचा सार्वजनिक परिसर हा खासगी बाजारच बनला की काय असा प्रश्न पडतो ? खरच हा परिसर रेड झोन होण्या ऐवजी हाय रिस्क झोन बनू नये याकडे लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज बनली आहे.
पार्किंगचा घोळ, नियम धाब्यावर !
बसस्थानकाच्या उजवीकडे चारचाकी, डावीकडे दुचाकी अशी सुबक असलेली आखीव रेखीव पट्ट्यांत असलेली पार्किंग का केली जात नाही ? दोन्ही बाजुला. सहा नव्हे तर दहा रस्त्यांचे जाळे असूनही समोरील बाजू मोकळी ठेवण्याचा नियम कुणालाच लागू नाही. जिथे जागा तिथे आडवी तिडवी गाडी. हाच एकमेव कायदा उरलेला दिसून येतो.
गाड्याना घ्या पट्ट्यात, अन् आकारा दंड !
बसस्थानकात खासगी वाहनांना सर्रास प्रवेश असल्याने प्रशासन स्वतःच अपघातांना निमंत्रण देत आहे. दुचाकींचा वावर इतका वाढलाय की प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्नच संपला आहे. यावर तत्काळ बंदी आणि दंडात्मक कारवाईची गरज बनली आहे.
अकोले गेट नेमके कशासाठी ?
अकोले कडील गेट कशासाठी बांधले ? फक्त मोर्चे, आंदोलनं आणि शक्तीप्रदर्शनासाठीच आहे का ? अथवा वाहतुकीची शिस्त मोडण्यासाठी ? मोर्चेच काढायचे असतील तर जाणता राजा मैदान, सारख्या मोकळ्या जागा आहेत. बसस्थानक हे आंदोलनाचे मैदान नाही, ते प्रवाशांचे सुरक्षित आश्रयस्थान असायला हवे. मग या ठिकाणी कोणी कसे वागा. कारवाई नाही, बंदी नाही, शिस्त तर अजिबात नाही. त्यात नागरिकांनाही सवय नाही ! मग सवय लावणार कोण ? बेशिस्तीला दंड लावा, गाड्या उचला, खासगी वाहन हद्दपार करा! कारण शहर हे शिस्तीने चालते, बेजबाबदारपणे नाही.
बस स्थानकाच्या आत येण्यासाठी अनेक रस्ते असून दर्शनी बाजुलाच हा रस्ता चारचाकीने अडवलेला असतो. या भागात जागोजाग चार चाकी आणि दुचाकीसाठी पट्टे मारण्यात यावेत. उजवीकडील बाजू चारचाकी करिता आणि डावीकडील बाजू दुचाकीला द्या. पट्ट्याच्या बाहेर दिसल्यास चित्रीकरण करून दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे तरच या बेशिस्तीला शिस्त लागेल.
पे अँड पार्क आकारा
या ठिकाणी पे अँड पार्कची सक्ती केल्यास निश्चितच वाहतुकीचा ताण कमी होवून बदल होईल. शहराला आणि वाहतूक व्यवस्थेला सुरळीतपणा येईल. या माध्यमातून नगरपालिकेच्या उत्पन्नात निश्चित भर पडेल. तसेच वाहतुकीला आळा बसल्याने अपघाताची संख्या कमी होण्यास एकप्रकारे मदतच होईल.

रीलचे वेड जीवघेणे ! रील तुमचे आयुष्य गुंडाळेल !
क्षणिक प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणारी ही रील संस्कृती आता घातक फॅड बनली आहे. युवकांमध्ये रील बनवण्याचे वेड इतके बळावले आहे की रस्ते, गाड्या, सिग्नल, गर्दी कुठेही कोणीही अभिनेता होत आहे. स्टुडिओ तर हातात हात घालून रेडी असतो. गाडीवर चालक, तर दुसरा मागे बसून उलट्या दिशेला तोंड करून अंगविक्षेप करत रील्स काढतो हा प्रकार घातक ठरू शकतो. सेकंदाच्या व्हिडिओसाठी स्वतःचा जीव तर धोक्यात जातोच, पण निष्पाप नागरिकाचा जीव जाऊ शकतो.या प्रकारावर पोलीस प्रशासनाच्या ठोस कारवाईचा अभाव जाणवतो.
