माणुसकीची जिवंत अनुभूती अनुभवली – डॉ. वाइन्स्टेन;
लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांना नवे आयुष्य ; १५० रुग्णांची तपासणी, ४७ यशस्वी शस्त्रक्रिया
संगमनेर ( भारत रेघाटे )
संगमनेरमध्ये रूग्णांबाबत काम करताना केवळ वैद्यकीय सेवा दिली नव्हे तर माणुसकीची जिवंत अनुभूती अनुभवली असे भावूक उद्गार अमेरिकेचे सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ. लॅरी वाइन्स्टेन यांनी काढले. संगमनेरमधील आपुलकी, रुग्णांचा उपचारांवरील विश्वास आणि येथील वैद्यकीय तज्ज्ञांची उच्च व्यावसायिक गुणवत्ता यामुळे आपण भारावून गेल्याचे डॉ. वाइन्स्टेन यांनी नमूद केले. येथील भुल तज्ज्ञांची बुद्धिमत्ता, संयम व कौशल्य उल्लेखनीय असून प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यातील आशा आणि उपचारांवरील विश्वास मनाला स्पर्शून गेल्याचे त्यांनी सांगितले. गरजू रुग्णांपर्यंत पोहोचलेली ही सेवा अनेकांच्या आयुष्यात नव्या आशेचा प्रकाश घेऊन आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सेवायज्ञामागे मोलाचे योगदान देणारे प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी, लायन्स क्लब ऑफ संगमनेर आणि भारतीय जैन संघटना यांचे आभार व्यक्त करताना, संगमनेरने मला केवळ एक कार्यक्षेत्र दिले नाही, तर आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी हृद्य आठवण दिली असे गौरवोद्गार वाइन्स्टेन यांनी काढले.

लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने शारीरिक व्यंगांमुळे न्यूनगंडात जगणाऱ्या गरजू रुग्णांसाठी आयोजित मोफत प्लॅस्टिक शस्त्रक्रिया शिबीर यशस्वीपणे पार पडले. डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. प्रवीणकुमार पानसरे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटल येथे हे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते.
प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व राणीप्रसाद मुंदडा यांनी सांगितले की, लायन्स क्लब ऑफ संगमनेर गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने अशा शिबिरांचे आयोजन करीत आहे. फाटलेले ओठ, टाळूतील छिद्रे, तिरळेपणा, वाकडे नाक, कान, शरीरावरील व्रण, गाठी तसेच जन्मजात हात,पायांच्या बोटांतील व्यंगांमुळे अनेक रुग्णांना सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा रुग्णांना आत्मसन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हाच या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या दोन दिवसांच्या शिबिरात सुमारे १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अमेरिकेतील सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ. लॅरी वाइन्स्टेन, डॉ. व्हिटने व त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट अमेरिकेतून येऊन या शिबिरात मोलाचे योगदान दिले उद्योजक .गिरीष मालपाणी, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, ओम मयूर ज्वेलर्सचे महेश मयूर, मर्चंट बँकेचे चेअरमन मधुसूदन नावंदर, श्रीनिवास पगडाल, आशीष बुब, एकनाथ पानसरे आदींनी सदिच्छा भेट देत शिबीरार्थींची विचारपूस करून उपक्रमाचे कौतुक केले.
शिबिरासाठी रामनारायण बुब मेमोरियल ट्रस्टसह मालपाणी उद्योग, अमृतवाहिनी सहकारी बँक, विजय व शारदा, संग्राम नागरी पतसंस्था, ओम मयूर ज्वेलर्स, धन्वंतरी हॉस्पिटल व उमागौरी वुमेन्स फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. अनिकेत कासार, डॉ. रसिका वाघोलीकर, डॉ. दातीर, डॉ. विनीत सुखटनकर, डॉ. हासे यांनी सेवा दिली. शिबीर यशस्वीतेसाठी डॉ. सुचित गांधी, राणीप्रसाद मुंदडा, चेतन कर्डिले यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
