माजी विद्यार्थ्यांनी दिली शैक्षणिक साहित्याची गुरुदक्षिणा;
विद्यार्थी विचारप्रेरणेचे प्रभावी स्त्रोत – अरुण ताजणे
{ मेळावा ठरला स्नेहांकूर }
संगमनेर : ( प्रतिनिधी )
महाविद्यालयीन शिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारी सकारात्मक कलाटणी ही त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या जडणघडणीसाठी निर्णायक ठरते. या प्रवासात महाविद्यालयीन संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक वातावरण मोलाची भूमिका बजावते. याच दृष्टीने आयोजित करण्यात येणारा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा हा शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांसाठी विचारप्रेरणेचा महत्त्वपूर्ण स्त्रोत ठरतो असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य अरुण ताजणे यांनी केले.
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी संघाच्या मेळाव्यात ताजणे बोलत होते. यावेळी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ४३ हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य महाविद्यालयाला भेट देण्यात आले. मंचावर प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. मारुती कुसमाडे, कार्यवाहक प्रा. मंगला आरोटे तसेच सचिव प्रा. अश्विनी वालझाडे उपस्थित होते. अरुण ताजणे पुढे म्हणाले की, शिक्षणातील अध्यापन पद्धती वेगाने बदलत असून एआयच्या युगातही शिक्षकांची भूमिका मार्गदर्शक म्हणून अत्यंत महत्त्वाची आहे. तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असले, तरी मूल्याधिष्ठित शिक्षण देणारा शिक्षक हा केंद्रबिंदूच राहणार आहे. माजी विद्यार्थी मेळावा म्हणजे महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख असून, विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी हे संस्थेच्या यशाचे प्रतीक आहेत.
या प्रसंगी शिक्षक भरती तज्ज्ञ व इग्नाइट अकॅडमीचे प्रमुख बापू गायकवाड, प्रकल्प प्रमुख सागर हांगे, एमकेसीएलचे जिल्हा व्यवस्थापक स्वप्नील लंभाटे, भाऊसाहेब आठरे, शशिकांत गलबले, डॉ. राजू शेख, डॉ. ज्योती मेस्त्री, प्रा. संजय खेमनर तसेच अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सविता घुले आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात आजी व माजी विद्यार्थ्यांमध्ये अनुभव, विचार आणि संस्कारांची देवाणघेवाण झाली. सूत्रसंचालन प्रा. नयना पंजे यांनी तर आभार प्रा. कविता काटे यांनी मानले. मोठ्या संख्येने आजी व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी झाला.

