जेव्हा आमदार सत्यजीत तांबे पत्रकारांच्या भूमिकेत रिंग मास्टर होतात ! पत्रकारांची लेखनी कधीच बोथट होत नसते. औचित्यपूर्ण स्नेहसंवादात सुख दुःखांची देवाणघेवाण करत पेटली विचारांची शेकोटी अन् जागवला आत्मविश्वास
संगमनेर ( भारत रेघाटे )
पत्रकारितेची जाण असलेले एक धुरंदर राजकारणी, पत्रकारांच्या समस्या, कोटुंबिक परिस्थिती जाणून त्याची समरसतेने सांगड घालत, संवादकौशल्य साधत आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार दिनानिमित्त केलेला स्नेहसंवाद हा त्यांच्या लेखनीला आणि जीवनाला न्याय देणारी अनुभूती ठरली. हा संवाद भाषणाचा नव्हता, राजकारणाचा तर मुळीच नव्हता. तर तो होता मनामनांची सांगड घालणारा. पत्रकारांच्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्श करणारा होता. रम्य अशा संध्याकाळी अमृतयोग साधत सहृदय विचारांची वाहिणी वाहत होती. प्रत्येकाच्या जीवनात चढ उताराची झालेली घालमेल शब्दबध्द करत त्यात अतूट दुवा निर्माण करून भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी सर्वच पत्रकार एकांतात आणि एकत्रित आमंत्रित करण्यात आले होते.. प्रत्येकजण आपापल्या अनुभवांच्या वर्तुळात उभा होता. पण त्या वर्तुळांना जोडणारा केंद्रबिंदू होता. त्या क्षणाचे साक्षिदार, भागिदार, पत्रकार, आमदार सत्यजीत तांबे रि़ग मास्टर होते. आपलेपणाची भावना. ती जवळीक, ती आत्मीयता क्षणिक नव्हती; ती प्रेरणा देणारी होती, विचार जागवणारी होती.

पत्रकारांचे भाव विश्व उलगडून घेण्याचा भावनिक नि प्रामाणिक प्रयत्न आमदार सत्यजीत तांबे, नगराध्यक्षा डॉ. मेथिली तांबे , माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केला. पत्रकारितेच्या झगमगाटामागे दडलेली आव्हाने, संघर्ष, ताणतणाव यांची जाणीव ठेवत एक औचित्यपूर्ण स्नेहसंवाद घडवून आणला. सुख दुःखांची देवाण घेवाण झाली आणि पेटली एक नव्या विचारांची शेकोटी. ती राजकारणाची चर्चा नव्हती, तर प्रत्येक पत्रकारांच्या जीवनाची एक एक खरी बातमी समोर येत होती. बोचऱ्या थंडीतल्या त्या रम्य संध्याकाळी शब्दांना देणारी ऊब होती. डोलाने उभ्या राहिलेल्या आजूबाजूच्या भिती, झाडे, पानफुले ही जणू कान देऊन ऐकत होती. आमदार सत्यजीत तांबे जणू एका रिंग मास्टरप्रमाणे शब्दांची सूत्रे हातात घेत होते. पण हे सूत्र नियंत्रणाचे नव्हे, तर समन्वयाचे होते. पत्रकारांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्याच्या चढ उतारांचा आलेख त्यांनी आपुलकीने समजून घेत पत्रकारांशी आपुलकीचा सेतू त्यांनी यावेळी उभारला.

नगरपालिकेच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेणारे सादरीकरण हे केवळ आकड्यांची मांडणी नसावी, तर लोकाभिमुख प्रशासनाची दिशा दाखवणारे असावे. हा विचार या संवादाच्या पायाशी होता. मुंबईसारख्या महानगरांतील तसेच परदेशातील उत्तम प्रशासन पद्धतींचा अभ्यास करून त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा उतरवता येतील, याचे दर्शन घडवणारा हा संकल्पच होता. याच पार्श्वभूमीवर पत्रकार दिनानिमित्त आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतलेली भूमिका अधिक अर्थपूर्ण ठरली.

राजकीय वलय असले तरी पत्रकाराच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे, आणि त्यांच्याशी स्नेहपूर्ण नाते जपणारे हे नेतृत्व स्वतः पत्रकारितेचा अनुभव घेऊन घडलेले आहे. म्हणूनच संवाद साधताना ते उपदेशक वाटत नाहीत, तर समजून घेणारे सहप्रवासी वाटत होते. किमान पत्रकार दिनानिमित्त तरी राजकीय बाबी बाजूला ठेवूया ! असे सांगत मी काय केलं यापेक्षा आपण कोणासाठी उभे आहोत हे महत्त्वाचं ब्रीद, हा नैतिक विचार भाषणापुरता न राहता कृतीत उतरला. पत्रकार हे केवळ बातम्यांचे वाहक नसतात. ते अनुभवांनी घडलेले असतात कोणी आर्थिक स्थैर्याने सक्षम, तर कोणी बौद्धिक संपन्नतेने समृद्ध. कोणी शोध पत्रकारितेत, कोणी सामाजिक पत्रकारितेत, तर कोणी वेगवेगळ्या प्रवाहांत कार्यरत. या संवादातून पत्रकारितेचे अनेक कंगोरे उलगडले. समाजाचा धांडोळा घेताना स्वतः मात्र कधीच पुढे न येणारे पत्रकार, पत्रकार दिनी तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे, त्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे, हा विचार ठळकपणे पुढे आला. पत्रकारांच्या कुटुंबीयांचे आयुष्य, मुलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यवसाय, मुलांचे लग्न, नोकरी या सगळ्यांचा मागोवा घेतल्याशिवाय पत्रकारितेची खरी किंमत कळत नाही, ते एक चॅलेंज आहे याची जाणीव यावेळी प्रकर्षाने झाल्याचे आमदार तांबे यांनी खास नमूद केले.

अनेक संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढतात; पण वैयक्तिक अडचणींमध्ये आपण खरोखर किती वेळा सोबत उभे राहतो, हा प्रश्नही या संवादातून उभा राहिला. प्रत्येक व्यक्तीकडे एक कथा असते, एक वलय असते. आपला जीवनप्रवास, संघर्ष, अनुभव नोंदवून ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कारण पत्रकार लेखनी कधीच बोथट नसते तो कधीच ‘माजी’ होत नसतो त्याची लेखणी, त्याची जाणीव कायम समाजासाठी चालूच असते. शेवटी पत्रकारांच्या सुख दुःखात सोबत राहण्याचा संकल्प, जीवनाला गांभीर्याने घेत, एक युनिक व्हिजन नजरे समोर ठेवून तो प्रभावी विचार यशाकडे वाटचाल करण्याचा असावा. पत्रकार भवनासाठी आपण कार्यतत्पर असून आपल्यातील माणुसकीचा सेतू अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी केला. या सर्वसमावेशक विचारातून पत्रकार दिन हा केवळ औपचारिक न राहता अर्थपूर्ण ठरला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, विलास गुंजाळ, चंद्रकांत शिंदे, श्याम तिवारी, गौतम गायकवाड, नितीन ओझा, राजा वराट, गोरक्षनाथ मदने, नामदेव कहांडळ, राजेश असोपा, बिंडू जहागीरदार, अनंत पांगारकर, सचिन जंत्रे, बाळासाहेब गडाख,,अमोल मतकर, महेश पगारे, संजय अहिरे, नीलीमा घाडगे, चंद्रकांत महाले, सोमनाथ काळे, मंगेश सालपे, आनंद गायकवाड, अंकुश बूब, राजाभाऊ जेधे, सलीम शेख, ओंकार सस्कर, साविद शेख, वासुदेव गायके, दिनेश बांगर, सुखदेव गाडेकर, विजय कदम आदिंसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
