ब्रेकिंग न्यूज :
भारत

चोरट्यांचे पोलिसांनाच आव्हान ! दहा दिवसात दहा पट गुन्हे ; शहर आणि परिसर दहशतीखाली; अहर्निश चोरट्यांचा धुमाकूळ, 15 तासात तब्बल तेरा घरफोड्या ; काही आरोपी जात्यात, काही सुपात, काही तो-यात

Blog Image
एकूण दृश्ये: 214

चोरट्यांचे पोलिसांनाच आव्हान ! दहा दिवसात दहा पट गुन्हे ; शहर आणि परिसर दहशतीखाली; अहर्निश चोरट्यांचा धुमाकूळ, 15 तासात तब्बल तेरा घरफोड्या ; काही आरोपी जात्यात, काही सुपात, काही तो-यात 

     संगमनेर ( प्रतिनिधी )

शहर परिसरात अहर्निश चोरट्यांचा चांगलाच धुमाकूळ वाढला आहे. चारी बाजुंनी शहराला घेरलय ! या धुमाकुळात पोलिसांची अक्षरशः धांदल उडत असून संगमनेर शहर आज कायद्याच्या छायेत नाही, तर कोयता गॅंग आणि चोरट्यांच्या दहशतीखाली जगत असल्याने चोरट्यांनीच आता पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले अशी काहीशी परिस्थिती संगमनेर शहर आणि परिसरात दिसून येत आहे.

दिवस कळेना, दुपार समजेना, रात्र तर वैराचीच, अक्षरशः अहोरात्र चोरट्यांनी शहराला चारही बाजूंनी वेढा घातला असेच चित्र सर्वत्र दिसत आहे. फक्त 15 तासात तब्बल 13 घरफोड्या लूट दहशत होऊनही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत, ही बाब केवळ चिंताजनक नाही तर संतापजनक आहे.

कुठे रात्री घरफोडी, कुठे सकाळी, तर कधी सायंकाळी, चक्क सकाळी ११ वाजताही चोरट्यांनी उच्छाद मांडल्याची घटना समोर आली आहे. काही चोर दुचाकीवर, तर काही पायी सीसीटीव्हीतही त्यांच्या हालचाली कैद होऊनही चोर मात्र सैराट होवून फिरतात. अशीच अवस्था आज संगमनेरात दिसून येत आहे. एकीकडे चोरीचं सत्र वाढतंय, या नव्या वर्षात दहा दिवसात दहापट गुन्हाची नोंद झाली परंतु आरोपी, गुन्हेगार चोर, चितपट झालेच नाही.

----- Advertisements -----

तर दुसरीकडे पोलिसांची धावपळ मात्र थांबत नाही. या घरफोड्यांमध्ये लाखोचे सोनं चांदी, दागिने, रोकड, वस्तू लंपास झाल्या. पोटाला चिमटा घेत जमा केलेली तुटपुंजी घेऊन चोर फरार झाले. काही अज्ञात काही सज्ञात चोरडे पोलिसांच्या नजरेत आहेत. एवढ्या घटनेने किती गुन्हे दाखल करणार ? कोण कोणती कलमे लावणार ? हा संभ्रम पोलिसासमोरच आहेच.

मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फिर्यादी मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी ऑनलाईन, कधी ऑफलाईन अशी भटकंती करताना दिसतात. संगमनेर पोलीसात आज फिर्यादींचा जत्थाच्या जत्था उभा ठाकला आहे. न्याय मागायला माणूस दमतोय, चोर मात्र मोकाट फिरतात ! महिला पुरुष पोलीस कर्मचाऱ्यासह आपले कर्तव्य बजावतात परंतु शहरात वाढत चाललेल्या बेधुंद बेभान बेछूट वर्तणूकीने नागरिकांची मात्र चांगली दमछाक होत असताना दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले शहर ,वाढलेली गुन्हेगारी आणि पोलीस प्रशासनाकडे असलेले मनुष्यबळाची कमतरता हे होय. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली, छडा लावण्याचे प्रयत्न झाले. पण प्रश्न असा निर्माण होतो की, एकीकडे गुन्हे दाखल करून घ्यायचे की ? चोरट्यांचा माग काढायचा ? मनुष्यबळ कमी, गुन्हे जास्त चोरटे फिरतात भरदिवसा नि रात्रीत तर दुसरीकडे पोलीस यंत्रणाच कात्रीत अडकल्याचे दिसून येत आहे, हेच उघड वास्तव आहे.

चोरट्यांना आता वेळ काळ उरला नाही; रिकामे घर दिसलं की टाक झडप तोंड कुलूप ! मग ती गोल्डन सिटी , आरगडे मळा, श्रमगाथा कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, मालदाड रोड, पुनर्वसन कॉलनी, असो ,सौभाग्य मंगल कार्यालय परिसर, तर जाणता राजा जवळील कोयता गॅंगचा काळजात धसक्कन घुसणारा प्रकार, दिल्ली नाक्यावर होणारी रक्तबंबाळ मारहाण असे नानाविध घटना आणि परिसरात पसरलेली दहशत तर अनेक कॉलनींत मंदिरामध्ये चोरट्यांनी पाय रोवलेल्या घटना, तोडफोड करत माल साफ असे चित्र विचित्र प्रकार घडत आहेत. 

भरदिवसा सुद्धा नागरिक महिला सुरक्षित नाहीत, काल चोरी झालेल्या घटनांमध्ये दत्तू आव्हाड, सोमनाथ येडे (साळी ) दत्तात्रय जोशी, कैलास गायके, शांताबाई सातपुते , प्रियंका ढोणे आदिंच्या घरी चोरी झाली कोणाचे कुलूप तोडले, हाती काही लागले नाही म्हणून चोरट्याने आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. तर काही ठिकाणी सोने, चांदी दागिने पैसा, वस्तू , हाती लागेल त्या लंपास केल्या. ही बाब पोलीस प्रशासनाला डोळे उघडे करायला लावणारी आहे. एकीकडे कोयता गँग, दुसरीकडे घरफोडीचा उच्छाद शहराची वाटचाल कुठे चालली ? कायद्याचा धाक कमी पडत असल्यानेच चोरट्यांची हिंमत वाढलीय, हा सवाल आता जनतेच्या मनात खदखदतोय.

----- Advertisements -----

श्वान पथक, फॉरेन्सिक तपासणी, ठसे आणि बरंच काही होऊन निकाल कुठे ? तपास सगळं कागदावर भारी, पण प्रत्यक्षात चोरटे मोकाट! आधीच गुन्ह्यांचा पडलेल्या ढीगाने कर्मचाऱ्यांवर तपासाचा प्रचंड ताण किती आणि कोणता तपास करणार ? असा थेट सवाल आता पोलीस कर्मचारीच प्रशासनाला विचारू लागले आहेत. प्रश्न एकच संगमनेर कोणाच्या भरोशावर ? आज संगमनेरला गरज आहे ती फक्त पाहणीची नाही, तर कडक कारवाईची. कारण चोरट्यांचा हा उच्छाद उद्या शहराला अराजकतेकडे घेऊन जाईल तेव्हा जबाबदारी कोण घेणार? जनता भयभीत आहे, चोर निर्ढावले आहेत. पोलीस यंत्रणाच संभ्रमात ही अवस्था बदलणार तरी कधी?

गुन्हेगारीविरोधात ठाम भूमिका आणि कणखर नेतृत्वासाठी ओळख निर्माण केलेले शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे छडा लावल्याशिवाय कुणालाही सोडत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. तर केवळ उपस्थितीनेच समोरच्यावर दरारा निर्माण करणारे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, राम मुखरे, आत्माराम पवार आणि हरिश्चंद्र बांडे हे अधिकारीही मैदानात ठामपणे उभे राहून कायद्याची अंमलबजावणी करत आहेत.

तपासात पारंगत असलेले तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून सातत्याने प्रभावी कामगिरी बजावत असून, पथक सालोमन सातपुते, अमित महाजन, महिला कर्मचारी, तसेच आशिष अरवडे , सचिन उगले, बन्सी टोपले, अनिता गुंजाळ, पटेल, राहुल सारबंदे बापूसाहेब हांडे अनिल कडलक, दत्ता मेंगाळ, सुनील ढाकणे, यांच्यासह संपूर्ण पोलीस पथक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी अहोरात्र झटत आहे. मात्र प्रश्न असा आहे की, एवढ्या जबाबदार आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नावे घेऊनही, वाढत्या गुन्हेगारीपुढे यंत्रणा अपुरी पडत असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम