सर्कल कार्यालयात केवळ कलकल; गायब असतात सर्कल ; नागरिक विचारतात कधी येणार ? उत्तर एकच : आयेंगे कल
संगमनेर ( प्रतिनिधी )
गेली आठ ते दहा दिवस संगमनेर तालुक्यातील मंडलाधिकारी (सर्कल) कार्यालयात पायही टाकत नसल्याने नागरिकांची विविध महसुली कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत. उत्पन्नाचे दाखले, उताऱ्यावरील नोंदी, दुरुस्त्या, बोजा चढवणे अशा मूलभूत कामांवरच जणू टाळेबंदी आल्याने नागरिक वैतागले असून कार्यालय परिसरात सतत कलकल सुरू आहे. मात्र या सर्व गोंधळात सर्कल मात्र जागेवर दिसतच नाहीत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, मिळणारे उत्तर एक
“आयेंगे कल सर्कल.” हा उद्या नेमका कोणत्या नव्या दिनदर्शिकेत ? असा उपरोधिक सवाल आता संतप्त नागरिक विचारू लागले आहेत. विश्वसनीय माहितीनुसार, तालुक्यातील एका ग्रामीण भागात रस्त्याच्या केसमधील वाद विकोपाला गेला. याच दरम्यान डी बी भालचिंम सर्कल यांची तब्येत बिघडल्याने हे उपचारासाठी दवाखान्यात दाखल असल्याचे सांगण्यात येते. मात्र, अशा परिस्थितीत प्रभारी सर्कलची तातडीने नियुक्ती करणे अपेक्षित असताना प्रशासनाची भोंगळ कारभारशैली पुन्हा एकदा उघडी पडली आहे.
प्रभारी नेमणुकीसाठी तहसीलदारांची उपस्थिती आवश्यक असताना, तहसीलदार धीरज मांजरे हेही चार ते पाच दिवस कामकाजावर गैरहजर असल्याचे समोर आले. अखेर पठाण नावाच्या अधिकाऱ्यावर अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला; मात्र दुसऱ्याच दिवशी बैठक मिटींगचे कारण पुढे करत तेही कार्यालयात रुजू झालेच नाहीत. विशेष म्हणजे, गेली काही दिवस नागरिकांची कामे रखडलेली असताना प्रभारी म्हणून पठाण यांनी ठाण मांडून बसणे अपेक्षित असताना पठाण प्रत्यक्षात कार्यालयाबाहेरच फिरताना दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे आमच्या कामाचे नेमके काय ? असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सर्कल कार्यालयातील कामकाज ठप्प असल्याने नागरिकांना काम न होताच विन्मुख परतावे लागत आहे. वेळ, पैसा आणि मानसिक तणाव वाढत असून डिजिटलायझेशनही डोकेदुखी ठरत आहे. उताऱ्यावर नोंद कमी करणे, बोजा चढवणे यांसारखी कामे ऑनलाईन प्रणालीत अडकून पडली आहेत. प्रणाली आहे, पण कार्यक्षमता नाही, हे वास्तव पुन्हा स्पष्ट झाले आहे.
एखादा वार मिळाला की गर्दीचा अक्षरशः स्फोट होतो. दोन दिवस काम रखडले की लगेच शनिवार–रविवारचे बंद दिवस आडवे येतात आणि कामे पुन्हा शून्यावर जातात. परिणामी नागरिकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर आहे.
मंडलाधिकारी गेली दहा दिवस रजेवर, तहसीलदारही गैरहजर, प्रभारी अधिकारी कार्यालयात न दिसणे हा सगळा प्रकार म्हणजे प्रशासकीय बेपर्वाईचा कळस नाही तर काय? ‘आयेंगे कल’च्या पुढे जाऊन आज निर्णय घ्या. प्रभारी तात्काळ रुजू करा आणि नागरिकांची कामे आत्ताच्या आत्ता सुरू करा. अन्यथा आता हा प्रश्न रस्त्यावर उतरेल !
