आता संगमनेर नगर परिषदेत सिंहासन तिशी, १ तिशी ; लाडकी सुनबाई पाहणार सिंहासनावरून पालिकेचा कारभार ; ३ जानेवारीला पदग्रहण ; विजयोत्सव तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजहितेषी ठरेल.! नगराध्यक्षा आमदारासह फिनलॅंड दौऱ्यावर
संगमनेर { भारत रेघाटे }
सिंहासन बत्तीसी हा महान राजा विक्रमादित्याच्या जीवनातील आदर्श, पराक्रम आणि न्यायबुद्धी उलगडणाऱ्या ३२ लोककथांचा प्रसिद्ध आणि दिशादर्शक संग्रह आहे. अशी आदर्शव्रत न्ययाबुध्दी नजरेसमोर ठेवून संगमनेरच्या राजकीय पऱंपरेत अनन्य साधारण काम करावेच लागणार हे निर्विवाद सत्य होय.

संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये सेवा समितीने एक अभूतपूर्व विजय प्राप्त करण्यासाठी मामा भाचे यांच्या रणनीती आणि कुटनीती ही विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी ठरली. या सर्व गोष्टीसाठी केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे आमदार सत्यजीत तांबे यांचे कमालीचे मायक्रो व्हिजन, अफलातून गुप्तता, रहस्यमय शांतता. तद्वत जनमाणसाने कुठेही बोलण्यातून व्यक्त न होता मत पेटीतून व्यक्त झाल्याचे ते एक द्योतक आहे.

आता पालिकेचे हेच सिंहासन जनतेला दिलेल्या जाहिरानाम्यातून आणि कार्यकतृत्वातून सालंकृत करावेच लागणार आहे. सिंहासन बत्तीसीचा आदर्श रचना डोळ्यासमोर ठेवत दरमहा तीस आणि 31 ह्या दिवसात महिण्यागणिक प्रभागातील कामे पूर्णपणे पार पाडावी लागणार. त्याची सुरूवातच शहराच्या प्रथम नागरिक मैथिली सत्यजीत तांबे यांनी पहिल्याच दिवशी दि २२ डिसेंबरलाच शहर स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा केला. तांबे ह्या ३ जानेवारीला सिंहासनावर विराजमान होणार आहेत.
राजा भोज जेव्हा त्या सिंहासनावर बसण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रत्येक बाहुली राजा विक्रमादित्याच्या न्यायप्रियता, शौर्य, करुणा, बुद्धिमत्ता आणि त्याग यांची एक एक कथा सांगते. या कथा ऐकून राजा भोजाला जाणवते की, विक्रमादित्यसारखे गुण अंगीकारल्याशिवाय सिंहासनावर बसण्याचा अधिकार मिळू शकत नाही. सिंहासन बत्तीसी या कथांचा उद्देश केवळ मनोरंजन नसून, आदर्श राजधर्म, नैतिकमूल्ये आणि नेतृत्वगुण समाजासमोर मांडणे हाच आहे. हीच दूरदृष्टी ठेवून लोकप्रिय राहण्यासाठी नगराध्यक्षा मैथिली तांबे यांना कर्मयोगाला प्राधान्य द्यावेच लागणार हे चाणाक्ष बुद्धीने त्या हेरून आहेत. किंबहुना हेच निर्विवाद सत्य ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यास त्यांनी पहिल्याच दिवशी आरंभ केला. अर्थात माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे सासुबाई यांच्या कारकीर्दीच्या तपाचा अनुभव पाठीशी असणारच आहे. 30 सवंगड्याची एकत्र वज्रमुठ बांधत 31 नंबर हा या पालिकेच्या कारभाराला एक सूत्रात बांधणार आहे. एवढेच नव्हे तर जनतेला विश्वासात घेत सादर केलेला जाहिरनामा पूर्णत्वास नेणार असल्याचा विश्वास संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी व्यक्त केला.
आपल्या सभोवती असे अनेक चेहरे असतात. आपण त्या चेहऱ्या बद्दल त्यांच्या कार्य कर्तृत्वाविषयी अज्ञान असतो. परंतु असे बरेच चेहरे कर्तव्यदक्ष असतात ! अशीच व्यक्तिमत्त्व ही दृष्टीआड का असतात ? ही त्या व्यक्तित्वाची चूक नसून समष्टीचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्या भूमिकेचाच नसतो. असाच एक सुज्ञ, सुसंस्कृत, सुशिक्षित, विद्याविभूषित चेहरा संगमनेर नगरपालिकेला अमूल्य अशा मतदानाच्या पेटीतून लाभला हे संगमनेरकरांसाठी एक अलौकिक संगमच होय. घराण्याला, व्यक्तित्वाला आणि नावालाही नाकारण्याची भूमिका विरोधका मधून प्रखरतेने दिसत असली तरी विजयाने संपूर्ण पालिकाच ताब्यात घेत विरोधकांची ती भूमिकाच आता मैथिली तांबे यांनी पादाक्रांत केली. महाराष्ट्रात मोठ्या मताधिक्याने त्यांनी हा विजयच जनसेवेसाठी संपादन केला. ज्या जनमानसाला मैथिली तांबे नावाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी फारसे ज्ञात नव्हते त्यांना ही एक चपराक ठरली. हे तितकेच खरे कारण त्याच्या विजयाचा हा परिपाक होय.

कोण आहेत डॉ मैथिली तांबे ?
मूळच्या खानापूर (जि. सांगली) येथील असलेल्या डॉ. मैथिली तांबे या दंतचिकित्सक असून उच्चशिक्षित आहेत. त्या मराठी, हिंदी, इंग्रजी व तमिळ भाषेत प्रभावी संवाद साधतात. त्या महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सदस्य सत्यजीत तांबे यांच्या पत्नी आहेत. 'ग्रामोदय' ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात तसेच “I Love Sangamner” उपक्रमातून महिला व युवकांसाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. महिला बचत गटांसोबतही त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. पुण्यातील 'टास स्कुल इंडिया'च्या मुख्याधिकारी म्हणून त्यांनी कार्यक्षम व्यवस्थापन पद्धती राबवून संस्थेची गुणवत्ता वाढवली. शिक्षण, आरोग्य व उद्योग क्षेत्रात त्या बिझनेस कन्सल्टंट व ट्रेनर म्हणूनही काम करतात. संगमनेर शहरात नवा नवखा असलेला चेहरा अल्पावधीतच प्रसिद्धीझोतात आला. कारण अशा लोकांचे व्यक्तिमत्त्व झाकत नाही. शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पारदर्शक कारभार आणि सर्वांना समान संधी देणे हेच डॉ. मैथिली तांबे यांचे मुख्य ध्येय आहे.

आता '2 . झिरो' व्हिजन ठोस कृतीत!
मतदानापूर्वी नागरिकांना अनेकदा भविष्यातील जाहीरनाम्यांची आश्वासने दाखवली जातात; मात्र ती प्रत्यक्ष कृतीत न उतरल्याने जनतेत नाराजी निर्माण झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते. परंतु दमदार आमदार सत्यजित तांबे यांनी मांडलेले '2. झिरो' व्हिजन हे केवळ शब्दांपुरते न राहता ठोस कृतीत उतरू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले आता तर प्रत्यक्षात दिसून येत आहे. दिलेल्या जाहीरनाम्यातील बदलांची अंमलबजावणी शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष सुरू झाल्याने आता हे आगळं वेगळं चित्रच नागरिकांच्या मनात रुजत आहे. विकासाच्या कामांना गती, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि स्पष्ट दिशादर्शक व्हिजन यामुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढताना दिसतो आहे. याच कारणामुळे आज अनेक नागरिकांच्या तोंडून समाधान आणि सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, जाहीरनामा म्हणजे फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष बदलाची ती एक सुरुवात आहे, याचे उत्तम उदाहरण आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वा खाली नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि संगमनेर सेवा समिती यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विजयोत्सव तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजहितेषी ठरेल.
आनंदोत्सव साजरा करणे ही मानवी प्रवृत्ती आहे. यश, विजय, सण उत्सव यांच्या निमित्ताने व्यक्त होणारा आनंद समाजाला ऊर्जा देतो, एकात्मता वाढवतो. मात्र हा आनंद व्यक्त करताना तो कुणासाठी त्रासदायक ठरतो का? पर्यावरणाला हानी पोहोचवतो का? किंवा माणुसकीच्या संवेदनांवर घाव घालतो का? याचे भान ठेवणे तितकेच आवश्यक आहे. दुर्दैवाने आज अनेक ठिकाणी आनंद साजरा करण्याच्या नावाखाली विवेक हरवताना दिसतो. रसायण मिश्रित उधळलेला गुलाल साप करण्यासाठी फोर हॉर्स पावर मोटरने पाण्याचा अमर्याद अपव्यय, प्रचंड आवाजाचे डीजे हे खरेच आनंदाचे प्रतीक आहेत का, की आनंदावरच विरजण घालणारे प्रकार आहेत ? रंगांनी माणसे नव्हे, तर निसर्ग आनंदात रंग भरते येतं. निळवंडेच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी रंगीबेरंगी होणे ही केवळ एक घटना नाही; ती बेफिकिरीचे जिवंत उदाहरण आहे. यातून आपण काय साध्य केले ? हा प्रश्न प्रत्येक विजयोत्सव साजरा करणाऱ्यानी स्वतःला विचारायला हवा.पाणी हे जीवनाचे अधिष्ठान आहे. ते रंगांमध्ये मिसळून, प्रदूषणाच्या विळख्यात ओढणे ही प्रगती नाही; ती सर्वासाठी घातक ठरू पाहत आहे. खरच गुलालाऐवजी पर्यावरणपूरक अबीर का उधळला जात नाही? आनंद व्यक्त करण्यासाठी आकाश फाटेल असाच आवाज हवा असतो का? डीजेला बंधने का घातली जात नाहीत? हे प्रश्न केवळ प्रशासना साठी नाहीत; ते समाज म्हणून आपल्या सर्वांसाठी आहेत. खरा आनंद हा इतरांच्या वेदनांवर उभा राहत नाही. तो शाश्वत असतो, संवेदनशील असतो आणि जबाबदारही असतो. समाजहित जपणारा आनंद आरोग्यासह शांततेतही समाधान मिळते. समाजाला आवाजाऐवजी नवी दिशा देण्याची, उधळपट्टीऐवजी जबाबदारीला, आणि दिखाव्याऐवजी संवेदनशीलतेला प्राधान्य दिले तरच आपला उत्सव खऱ्या अर्थाने समाजहितेषी ठरेल.

विकासाच्या नव्या पर्वाची नांदी ; नगराध्यक्षा व आमदार फिनलॅंड दौऱ्यावर
-- संगमनेर नगरपालिकेवर चार वर्षांपूर्वी प्रशासकीय कारभार लागू होता. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ( संगमनेर सेवा समितीने ) दणदणीत विजय मिळवत सत्तेचे सिंहासन काबीज केले. आता नव्या उमेदीने पालिकेत तब्बल १६ महिला आणि १५ पुरुष नगरसेवक, नगराध्यक्षा या शहराच्या कारभाराची जबाबदारी सांभाळणार आहेत. नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक ३ जानेवारी रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. विशेष बाब म्हणजे याच दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. शिकलेल्या, सवरलेल्या सावित्रीच्या लेकी या ऐतिहासिक दिवशी जनसेवेच्या कार्याला सज्ज राहणार आहेत, ही बाब संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद ठरणारी आहे. दरम्यान, संगमनेर सेवा समितीने मतदानापूर्वी दिलेला जाहीरनामा केवळ आश्वासनांपुरता न ठेवता, प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतर लगेचच कृतीत उतरवण्यास सुरुवात केली आहे. एक कर्तव्यदक्ष आणि जबाबदार नगराध्यक्षा म्हणून शहरात दुसऱ्याच दिवशी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करत, तसेच शहरातील विविध समस्यांकडे थेट लक्ष देत सकारात्मक आणि आशादायी सुरुवात केली आहे.ही सुरुवात संगमनेरच्या विकासाच्या नव्या पर्वाची नांदी ठरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरात नवचैतन्य ;स्वच्छतेतून कार्यकाळाची दमदार सुरुवात
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत देदीप्यमान यश मिळवल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे व सर्व नगरसेवकांनी शहर स्वच्छतेचा संकल्प करत आपल्या कार्यकाळाची सकारात्मक व प्रेरणादायी सुरुवात केली. शहराच्या महत्त्वाच्या हायटेक बसस्थानकापासून स्वतः हातात झाडू घेऊन त्यांनी पालिका कर्मचारी सोबत स्वच्छता मोहीम राबवत जनतेत नवा उत्साह निर्माण केला. या उपक्रमांतर्गत बसस्थानक परिसर, नाशिक, पुणे महामार्गावरील लक्ष्मी रोड येथे साफसफाई करण्यात आली. हायटेक बसस्थानक येथील दत्त मंदिरात श्री दत्ताची आरती करून सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह कामाला प्रारंभ करण्यात आला. संगमनेरचे हायटेक बसस्थानक हे शहराचे प्रवेशद्वार मानले जाते. मात्र मागील काही काळात अनधिकृत फ्लेक्स, अस्वच्छता व विद्रूपीकरणामुळे परिसराचा देखावा बिघडला होता. याची दखल घेत नव्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. रात्रीच्या सुमारास ऑरेंज कॉर्नर ते बसस्थानक हा संपूर्ण नाशिकपुणे रोड परिसर धुऊन काढण्यात आला, तर सकाळी स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. यावेळी सफाई कामगार माता भगिनीं सोबत आपुलकीने संवाद साधत त्यांच्या कष्टाचे व समाजोपयोगी कार्याचे मनापासून कौतुक करण्यात आले.
