गॅस वितरणात बेजबाबदारपणा; महिलांचा संतप्त पवित्रा ; घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा हॉटेल व्यावसायिकांना प्राधान्य काळाबाजार तेजीत ?
संगमनेर (प्रतिनिधी)
शहरासह संगमनेर गावठाण, उपनगर, राहणे मळा व आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा कृत्रिम आणि तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक, विशेषतः महिलावर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. नियमित नोंदणी करूनही वेळेवर सिलिंडर न मिळाल्याने महिलांनी गॅस एजन्सीच्या कारभारावर कडक शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
सिलिंडर घरपोहोच होत नसल्याने घरगुती स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेली तीन आठवड्यापासून नोंदणीकरूनही आज येईल, उद्या येईल अशी पोकळ आश्वासने देत असून पंधरा पंधरा दिवस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप महिलांनी केला. सोमवारी, मंगळवारी येईल असे सांगूनही यामुळे महिलांचा संयम सुटू लागला असून आता एजन्सी विरोधात उघड नाराजी व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकीकडे घरगुती ग्राहकांना सिलिंडर उपलब्ध नाहीत असे सांगितले जात असताना, संगमनेर शहर व उपनगरातील हॉटेल व्यावसायिकांना मात्र तात्काळ पुरवठा होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे घरगुती सिलिंडरचा काळाबाजार खुलेआम सुरू असल्याचा संशय बळावला असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का ? असा थेट सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
ग्राहक गेली तीन आठवड्यांपूर्वी नोंदणी करूनही मनुष्यबळ नाही, गाड्या उपलब्ध नाहीत अशी कारणे पुढे केली जात आहेत. मात्र याच काळात काहींना जादा दराने सिलिंडर मिळत असल्याचे प्रकार उघड झाल्याने प्रकरण अधिक गंभीर ठरत आहे. यापूर्वी नोंदणीनंतर दोन दिवसांत सिलिंडर मिळणारी सेवा आता पूर्णपणे विस्कळित झाली आहे. फोनवर उडवाउडवीची उत्तरे, समाधानकारक सुध्दा माहिती न देणे, ग्राहकांशी उद्धट वागणूक असा अनुभव नागरिक घेत आहेत.
दिवेकर गॅस डिस्ट्रीब्युटर्स क्रमांक 92579 81638) यांच्याशी संपर्क साधला असता अनेकदा टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप महिलांनी केला. दोन दिवसांत केवळ एकच गाडी येत असल्याचे सांगून मनुष्य बळ नाही उडवाउडवी उत्तर देणे, एकूणच सिलिंडरची कमतरता भासत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या संशयास्पद आणि गोंधळलेल्या वितरण व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. प्रशासन व संबंधित गॅस कंपनी तत्काळ कारवाई करणार की महिलांचा उद्रेक रस्त्यावर उतरण्याची वाट पाहणार असा थेट सवाल आता संगमनेरकर विचारत आहेत.

