पोलीस सुरक्षेचा दावा हवेतच बस स्थानकात चोरी ; महिलेचे २ लाखांचे मंगळसूत्र लंपास; शेतविहिरीतील मोटार लंपास
संगमनेर ( प्रतिनिधी )
संगमनेर शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. एकीकडे बस स्थानका सारख्या गजबजलेल्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला जाते, तर दुसरीकडे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी बेधडक उचलल्या जात आहेत. चोरट्यांचा हा उच्छाद पाहता पोलीस गस्त कुठे आहे ? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शनिवारी (दि. ३) दुपारी घारगाव येथील आशालता मनोहर आहेर (वय ६८) या संगमनेर बस स्थानकातून अकोला येथे जाण्यासाठी उभ्या असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र क्षणात लंपास केले. सीसी टीव्ही, पोलीस गस्त आणि सुरक्षेचा दावा हवेतच विरल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शहर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. तपास पोलीस हासे करीत आहे.

दुसऱ्या घटनेत माळवाडी शिबलापूर परिसरातही चोरट्यांनी हात साफ केला. शेतकामासाठी विहिरीवर बसवलेली पाणबुडी मोटार अज्ञात चोरट्याने उचलून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ६ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत घडली असून, तब्बल महिनाभर चोरट्यांनी मजा मारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सागर भीमराज मुतोडे माळवाडी, सिबलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी पोलिसात कलम ३०५ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नागरिक असोत वा ग्रामीण भागातील शेतकरी आज कोणीही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. चोरीच्या घटनांचा आलेख चढता असताना, पोलीस प्रशासन केवळ गुन्हे नोंदवण्यातच व्यस्त आहे का ? चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी ठोस कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आता तरी संगमनेर पोलिसांनी कडक गस्त, नाकाबंदी आणि तत्काळ कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
