अहिल्यानगरमध्ये वर्षाअखेरीचा ट्रॅफिक ‘क्लीनअप’ नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा १३४ केसेस, १.५८ लाखांचा दंड ; संगमनेर मध्ये ९ तळीराम लागले हाती ; अकोले, राजूर परिसरात अवैध धंद्यांवर ठोस पावले नाहीत
अहिल्यानगर ( प्रतिनिधी )
वर्षाअखेरीस अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व शहरातील वाहतूक शिस्तीत आणण्यासाठी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेने विशेष नाकाबंदी मोहीम राबवली. शहरात अनेक ठिकाणी अचानक नाकाबंदी करत नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कोणतीही तडजोड न करता कडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत विनासीटबेल्ट वाहन चालविणारे ११, काळी काच लावलेली १३ वाहने, मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे ४, रहदारीस अडथळा निर्माण करणारे २३, विनालायसन्स ९, विनानंबर प्लेट २३ तसेच ड्रंक अँड ड्राईव्हचे तब्बल १८ प्रकार उघडकीस आले. मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण १३४ केसेस दाखल करून १ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत ही विशेष मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे शहर वाहतूक शाखेने जाहीर केले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्गीव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरे यांच्या आदेशानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोर्से यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार आण्णासाहेब परदेशीर वींद्र घायतडक, मन्सूर सय्यद, रामराव शिरसाठ, गणेश आरणे, संजय घोरपडे, गणेश कर्डीले, मधुकर ससे, राम शिरसाठ या पथकाने केली.

संगमनेर मध्ये थर्टी फर्स्टला ९ तळीरामांवर धडक कारवाई
३१ डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकादशीमुळे शहरात संयमी वातावरण असतानाच, दुसरीकडे मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर शहर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला. बसस्थानक परिसर, अकोले रोड, १३२ केव्ही आदि परिसरात दारू पिऊन आरडाओरड, राडारोडा, वादविवाद व नागरिकांना त्रास देणाऱ्या तब्बल नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत काही प्रतिष्ठित व बड्या नावांचाही समावेश असल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, असा ठाम संदेश पोलिसांनी या धडाकेबाज कारवाईतून दिला आहे. शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रीकांत सावंत, आत्माराम पवार, विजय खुळे, राम मुकरे, विजय आगलावे, मनीषा पुरी, हरिश्चंद्र बांडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी कडक गस्त घालत ही कारवाई यशस्वी केली. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढेही अशा समाज विघातक कृत्यांवर कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.

खुलेआम दारूविक्री सुरूच, कारवाई कुठे ? अकोले, राजूर परिसरात अवैध धंद्यांवर ठोस पावले नाहीत
अकोले राजूर परिसरात अवैध दारूविक्री खुलेआम सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असताना, तक्रारी करूनही पोलीस यंत्रणा गप्प का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. दारूच्या वाढत्या त्रासामुळे महिलांनी यापूर्वी रस्ता रोकोसारखी आंदोलने केली; मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. विशेष म्हणजे ३० व ३१ डिसेंबरसारख्या संवेदनशील काळात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री झाल्याची माहिती असूनही अकोले व राजूर पोलिसांकडून कारवाई न झाल्याचे चित्र आहे. यामुळे काही ठिकाणी थातूरमातूर कारवाई फक्त दिखावा का? ग्रामीण भागात वेगळे नियम आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. अवैध दारूविक्रीमुळे तरुण पिढी बिघडत असून महिलांवर, कुटुंबांवर आणि सामाजिक शांततेवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत.आता तरी अवैध दारूधंद्यांवर पोलिस कठोर कारवाई करणार की तक्रारी व आंदोलनं पुन्हा एकदा दुर्लक्षित ठरणार, याकडे लक्ष लागले आहे.
