विकास निधी गावागावांपर्यंत पोहोचविणार – आमदार अमोल खताळ कासारा दुमाला येथे १ कोटी ३९ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
संगमनेर ( प्रतिनिधी)
केंद्र व राज्यात आपल्या विचारांचे सरकार असून संगमनेर तालुक्याला विधानसभा आमदार लाभल्याने विकास निधी थेट गावागावांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत मी स्वतः पोहोचलो असून विकास निधीही प्रत्यक्षात पोहोचवला आहे. मात्र निधी कोण आणतो, हे जनतेने ओळखणे आवश्यक आहे, असे ठाम मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील कासारा दुमाला येथे शुक्रवारी (दि. २६) विविध विकासकामांचा १ कोटी ३९ लाख रुपयांचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास सरपंच राजेंद्र त्रिभुवन, उपसरपंच अमोल वाळके, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश काळे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, गेल्या एक वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यासाठी हजारो कोटींचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र हा निधी नेमका कोणी आणला, हे जनतेपर्यंत पोहोचवण्यात कार्यकर्ते कमी पडले आहेत. “निधी मी देतो आणि श्रेय दुसरेच घेतात,” असा ट्रेंड तालुक्यात सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी असते. आमच्याकडे धनशक्ती नसली तरी जनतेचा विश्वास आणि साथ आहे. याच बळावर ग्रामीण भागात विकासकामे वेगाने सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
कासारा दुमाला गावासाठी अवघ्या एका वर्षात १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगत त्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये दहशत, दबाव किंवा धनशक्तीला बळी न पडता गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
पदवीधर आमदारांवर अप्रत्यक्ष टीका करताना आमदार खताळ म्हणाले, संगमनेरला मोठा निधी आणल्याचा दावा केला जात असेल, तर नाशिक (सिन्नर), धुळे (साक्री), जळगाव (चोपडा) आणि अहिल्यानगर (कर्जत–जामखेड) येथे किती निधी दिला, हेही सांगावे. पदवीधर आमदारांचे काम हे पदवीधरांपुरतेच मर्यादित राहिले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
निमगाव जाळीत बिबट पार्क उभारणार!
“संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. पकडण्यात येणाऱ्या बिबट्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निमगाव जाळी शिवारातील दुधेश्वर वनविभागाच्या शासकीय जागेवर बिबट सफारी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पकडलेले बिबटे पुन्हा जंगलात सोडले जाणार नाहीत. मात्र कोणतेही पद नसताना केवळ फोटोसेशनसाठी बैठकांना जाणे म्हणजे काम पूर्ण झाले, असे नव्हे.
