हिंदू तरुणाच्या हत्येचा निषेध ; मृतदेहाची विटंबना संगमनेर मध्ये तीव्र पडसाद ; महायुतीकडून बांगलादेशी ध्वजदहन
संगमनेर ( प्रतिनिधी )
बांगलादेशात अल्पसंख्यांक समाजातील तीसवर्षीय हिंदू तरुणावर अमानुष हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मृतदेह झाडाला बांधण्यात आल्याचेही वृत्त असून, या क्रूर प्रकाराचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. २५) संगमनेर बसस्थानक परिसरात महायुतीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी बांगलादेशी ध्वजाचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. आंदोलना दरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित घटनेचा जाहीर शब्दांत निषेध नोंदवला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अत्यंत निंदनीय असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या निषेध आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे,आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी, माजी तालुकाध्यक्ष रमेश काळे, युवासेना जिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, सपना जाधव, प्रवीण कर्पे, राहुल भोईर, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
