कुरण चौफुलीवर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू ठार ; तर आश्वी परिसरात बिबट्या कॅमेरात कैद : समनापुरच्या घटनेने वन विभागाची धावपळ
संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा वावर लक्षणीयरीत्या वाढला असून शेती परिसर, रस्ते, ग्रामीण तसेच शहरी भागातही बिबटे दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी (दि. २०) रात्री सुमारे आठ ते साडेआठच्या दरम्यान सुकेवाडी कुरण चौफुली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वन विभागाला कळवले.
सुकेवाडी परिसरातील घटनेबाबत माहिती देताना वन- परिक्षेत्र (भाग–२) चे अधिकारी सागर केदार यांनी सांगितले की, मृत बिबट्याच्या पिल्लाला नर्सरी येथे नेण्यात आले असून त्याची तपासणी व आवश्यक प्रक्रिया करण्यात येणार आहे. शवविच्छेदन करून ठरलेल्या SOP नुसार पुढील सर्व कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढल्याने त्यांच्या पिल्ल्यांचाही वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परिणामी बिबटे राजरोसपणे शेतात, रस्त्यालगत तसेच मानवी वस्तीच्या आसपास फिरताना आढळत आहेत. यामुळे वन्यजीव–मानव संघर्षासह अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांनी वेग कमी ठेवून अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित होत आहे. दरम्यान, वन विभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेत तालुक्यातील अनेक गावांत पिंजरे लावले असून ड्रोनद्वारेही बिबट्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. बिबट्या दिसल्यास नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी, गर्दी करू नये तसेच फोटो व्हिडिओ काढण्यासाठी जवळ जाऊ नये, असे आवाहन वन विभागाचे सागर केदार यांनी केले. पाळीव प्राणी व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. गेली अनेक दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याच्या अफवांमुळे परिसरात दहशत पसरली आहे. कालही आश्वी मध्ये बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली. दरम्यान, समनापुर परिसरात एका झुडपात बिबट्या असल्याची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली. वन विभागाने तातडीने धाव घेऊन शोधमोहीम राबवली असता तो बिबट्या नसून रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळेही वन विभागाची चांगलीच धावपळ उडाली. बिबट्या हा जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असला तरी मानवी वस्तीत वाढलेला त्याचा वावर चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे वन विभाग व नागरिक यांच्यातील समन्वयातूनच या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी मागणी होत आहे.
