बेपत्ता महिलेचा शेततळ्यात मृतदेह आढळला; आत्महत्या ? चिंचोली गुरव येथे मध्य प्रदेशातील मजुराने घेतला गळफास
संगमनेर ( प्रतिनिधी )

मालदाड परिसरात दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह घरालगतच्या शेततळ्यात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी (दि. १८) सकाळी बेपत्ता झालेल्या महिलेचा शनिवारी (दि. २०) दुपारी मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत महिलेचे नाव कौशल्या सखाहरी नवले (वय ५५, रा. मालदाड) असे आहे. बेपत्ता झाल्यानंतर तालुका पोलीस, कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबवली होती. संभाव्य मार्ग, ओळखीची ठिकाणे तसेच इगतपुरी, घोटी व जवळके कोराळे परिसरात शोध घेण्यात आला. सुमारे तीस तासांच्या शोधानंतरही महिला न आढळल्याने नातेवाईकांनी तालुका पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर शनिवारी दुपारी घरालगतच्या शेततळ्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेद करून त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, चिंचोली गुरव येथेही आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. काकडवाडी चिंचोली गुरव रस्त्यावरील चिंचोली गुरव गावात मध्य प्रदेशातील एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव राजू मदनसिंह नोरिया ( २७, रा. मरेली, मध्य प्रदेश) असे असून, तो कामा निमित्त संगमनेर तालुक्यात आला होता. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथील वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृत्यूमागील कारणांचा शोध सुरू आहे.दोन्ही घटनेत भा न्या सं १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून घटनांचा तपास तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस बिलाल शेख करीत आहे.

