ब्रेकिंग न्यूज :
भारत

निळवंडे कालव्यात पडून बहीण आणि पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू ; होळीच्या दिवशीच काळाचा घाला 

Blog Image
एकूण दृश्ये: 205

निळवंडे कालव्यात पडून बहीण आणि पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू ; होळीच्या दिवशीच काळाचा घाला 

   संगमनेर ( प्रतिनिधी )

होळीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी परिसरातून एक हृदयद्रावक दुर्दैवी घटना सोमवार दि. २ मार्च रोजी दुपारी २ :३० च्या सुमारास निळवंडे कालव्यात घडली. फिर्यादी विशाल बागड‌ यांची बहीण आणि पुतण्या अशा दोघांचाही दुर्दैवी करूण अंत झाला.

या दुर्दैवी घटनेत ज्योती प्रकाश आवारी (वय ४२) व अथर्व राहुल बागड (वय ८) हे दोघे घुलेवाडी परिसरातील निडो शाळेच्या मागील बाजूस असलेल्या निळवंडे कालव्या जवळ दुपारी १२:३० च्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी ज्योती आवारी, कोमल राहूल बागड (भावजई ) आणि अथर्वची लहान बहीण स्वरा राहूल बागड व अथर्व हे सर्व गेले होते.

एकीकडे ह्या महिला कपडे धूत असताना अथर्व कालव्याच्या दिशेने पुढे गेला तेवढ्यात अथर्वचा पाय घसरून तो कालव्यात पडला. धाबकन असा आवाज कानी पडताच भाच्याला वाचवण्यासाठी ज्योती आवारी यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी मारली. मात्र कालव्यातील पाण्याची खोली आणि वेगाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ज्योती यांची भावजय कोमल यांनी आरडाओरडा करताच त्याठिकाणी नागरिक एकच गर्दी केली.

तेवढ्यात ॲम्बुलन्सही आली. ॲम्बुलन्स चालकाने दोघांना बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला. दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान अथर्वमध्ये थोडी धाकधूक व हालचाल सुरू असल्याचे काका विशाल यांनी सांगितले. ज्योती आवारी यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याचाही मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

----- Advertisements -----

या प्रकरणी विशाल भास्कर बागड न्यू स्ट्रॉबेरी स्कूल अमृत पार्क घुलेवाडी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या दोघांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात होळीच्या दिवशीच अंतिम संस्कार करण्यात आले. ऐन सणासुदीच्या दिवशी या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्योती आवारी ह्या काही वर्षापासून आपल्या भावाकडेच राहत होत्या. तर अथर्व हा निडो स्कूलमध्ये इयत्ता दुसरी शिकत होता. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेचा पुढील तपास महिला पोलीस लता जाधव करीत आहेत.

शिक्षणाशिवाय जीवन अधू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin