चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून ; न्यायालयाने सुनावली कोठडी
संगमनेर :प्रतिनिधी
तालुक्यातील घारगाव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची निघृनपणे हत्या केल्याची आणि मन सुन्न करणारी धक्कादायक घटना घडल्याने शहरासह ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.

बुधवार दि.30 जुलै ते 31 जुलै ला मध्यरात्रीच्या सुमारास सदरची घटना घारगाव खंदारे वस्ती येथे घडली आहे. आरोपी दगडू खंदारे हे नेहमीच चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नी बरोबर वाद घालत असत. पत्नी चंद्रकलाचे गावातील एका व्यक्ती बरोबर अनैतिक संबंधाचा राग मनात धरून पत्नी चंद्रकला यांच्या डोक्यावर कुराडीने गंभीर वार करत तिला ठार केले. या घटनेत चंद्रकला दगडू खंदारे 60 घारगाव, ता. संगमनेर यांना आपला जीव गमवावा लागला.
या प्रकरणी मुलगा भीमा खंदारे वय 40 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडील दगडू लक्ष्मण खंदारे वय 65 घारगाव खंदारे वस्ती यांच्या विरोधात घारगांव पोलीसांनी भारतीय न्याय संहिता 103 (1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घारगाव पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी आरोपी दगडू लक्ष्मण खंदारे यांस तात्काळ ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालया समोर हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

