आमदार खताळांनी जाणल्या कृषकांच्या वेदना; खतापासून वंचित राहिला नाही पाहिजे शेतकरी. कृषी विभागाने घ्यावी दक्षता दिले निर्देश
संगमनेर ( भारत रेघाटे )
खरीप हंगामासाठी सरकारने संगमनेर तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा पुरवठा केला आहे. मात्र काही ठिकाणी युरियाच मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. तालुक्यातील कोणताही शेतकरी युरिया खतापासून वंचित राहणार नाही याची दक्षता कृषी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत. कृषी दिनाचे औचित्य साधून या महत्त्वपूर्ण घटनेकडे आमदार खताळ यांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
संगमनेर तालुक्यात युरिया खताचा पुरेसा पुरवठा असतानाही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याने या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सर्व कृषी सेवा केंद्र सहकारी संस्था यांचा समन्वय साधून युरियाचा साठा निश्चित करा , शेतकऱ्यांना तांत्रिक कारणाने युरिया खत मिळण्यास काही अडचणी येत असेल तर त्यावर तात्काळ उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे. कृषी सेवा केंद्र चालक अगर सहकारी संस्था युरिया असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे स्पष्ट निर्देश आ. खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

१ जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. संगमनेरच्या कृषी विभागाला आमदार खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली ४११ मेट्रिक टन युरिया खत प्राप्त झाले होते. त्यातील २०५ मेट्रिक टन युरिया खताचे वितरण पूर्ण झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रे आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे. तालुक्यात काही ठिकाणी युरिया टंचाई असल्याच्या विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मागणी नुसार पुरवठा होत आहे. कुठे अडवणूक होत असेल तर संपर्क कार्यालयात कळवावे असे ते म्हणाले.
