ब्रेकिंग न्यूज :
भारत

अकोले तालुक्यात बालविवाह विरोधी मोहीम वेगात; लढ्यासाठी तहसीलदार डॉ. मोरे यांचा कडक इशारा

Blog Image
एकूण दृश्ये: 50

अकोले तालुक्यात बालविवाह विरोधी मोहीम वेगात; लढ्यासाठी तहसीलदार डॉ. मोरे यांचा कडक इशारा

   अकोले ( भारत रेघाटे )

बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे लढले पाहिजे. या प्रकरणात कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होईल असा स्पष्ट इशारा अकोले तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी दिला. तालुक्यात अलिकडेच तीन बालविवाहाचे गुन्हे नोंदल्याने प्रशासन आता एक्शन मोड मध्ये आले आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त अकोले येथे जिल्हा महिला व बाल विकास विभाग, तहसील कार्यालय, अकोले तालुका बाल संरक्षण समिती आणि 'रविवारची शाळा' यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाहविरोधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, महिला व बाल कल्याण अधिकारी प्रशांत गायकवाड, शुभांगी रोहकले, हेरंब कुलकर्णी, मंगला हांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेत बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, बालविवाह हा गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. मुलींचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या प्रथेविरुद्ध ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व शाळांचे मुख्याध्यापक यांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे. बालविवाहाची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कळवावे, विवाह थांबवावा, पालकांचे समुपदेशन करावे, आणि बालविवाह झालाच तर पोलिसांकडे तक्रार देणे बंधनकारक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अकोले तालुक्यात येत्या काळात एकही बालविवाह होऊ नये यासाठी बालविवाह मुक्त भारत अभियान 100 दिवस प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

बालविवाहाचे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा सत्कार :- अलीकडे बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेऊन तक्रार करणाऱ्या पर्यवेक्षिका सोनाली धनगडे, ग्रामविकास अधिकारी विनायक कर्डक, मुख्याधिकारी धनश्री पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुगाव बुद्रुकचे पोलिस पाटील राजेंद्र शिंदे यांनी बालविवाह थांबवल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला. बालविवाहविषयी पुस्तक लिहिल्या बद्दल हेरंब कुलकर्णी यांचाही सन्मान करण्यात आला. श्रीनिवास रेणुकदास यांनी प्रास्ताविक, अर्चना एखंडे यांनी स्वागत, रमेश खरबस यांनी सूत्रसंचालन केले.

 

स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाचा पाया आहे.

अज्ञात