दिवसाढवळ्या जामखेडमध्ये थरारक फायरिंग; गावठी कट्ट्यासह तीन आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
जामखेड (प्रतिनिधी)
जामखेड बीड रोडवरील हॉटेल न्यू कावेरी येथे दिवसाढवळ्या झालेल्या फायरिंगने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीर दखल घेत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत धडक कारवाई करत तीनही आरोपींना जेरबंद केले.
या कार्यवाहीत मुख्य आरोपी उल्हास उर्फ वस्ताद विलास माने (वय ४९, रा. जामखेड) याला आष्टी येथून अटक करण्यात आली. त्याच्या कबुलीनंतर उर्वरित आरोपी शुभम शहाराम लोखंडे (वय २६) व बालाजी शिवाजी साप्ते (वय २७, दोघे रा. आष्टी, जि. बीड) यांना वाळुंज शिवारातील हॉटेल शाम परिसरातून ताब्यात घेण्यात आले. फिर्यादी रोहित अनिल पवार (रा. कान्होपात्रानगर, जामखेड) यांच्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला असून ते जखमी झाले. घटनेनंतर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा तसेच २० हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 109, 189(2), 191(2), 190, 324(5), 351(2)(3) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. एलसीबी चेकिरणकुमार कबाडी पोउपनि अनंत सालगुडे पो.अंमलदार अतुल लोटके, शामसुंदर जाधव, बाळासाहेब गुंजाळ, मनोज साखरे, सागर ससाणे, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर या पथकाने सदर कारवाई केली. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर सोमनाथ घार्गे मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या जलद व प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
