सापडलेल्या पैशातून गोर गरिबांची दिवाळी झाली गोड
संगमनेर ( भारत रेघाटे )
अनेक संस्कृती आणि धर्मांमध्ये दान देणे हे एक पुण्यपूर्ण कृत्य मानले जाते. गरजूंना दया, करुणा आणि उदारता दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. "समाजाचे समाजाला" या हेतूने आपण समाजाप्रती कृतकृत्य झालो पाहिजे.
खांडगाव येथील शेतकरी संदीप गुंजाळ यांना सापडलेल्या पैशातून गरिबांची दिवाळी गोड खांडगावातील काही गरीब कुटुंबाची दिवाळी गोड झाली. यामध्ये दिवाळी किराणा, फराळाचे सामान काही कपडे दान केल्याने गुंजाळ यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शेतकरी संदीप गुंजाळ यांना दिवाळीच्या दोन दिवस आधी रस्त्यावर तब्बल 12 हजार रूपये सापडले. त्यांनी सोशल मीडियात या संदर्भात एक पोस्ट शेअर करत कोणाचे पैसे असेल तर ,ओळख पटवून घेऊन जावेत असे आवाहनही केले होते. परंतु कोणीही याबाबत पुढे न आल्याने अखेर त्यांना एक कल्पना सूचली.
समाजात अनेक तळागाळात राहणारी सर्वसामान्य माणसे आहेत की, जे दिवाळी सुद्धा साजरी करू शकत नाही. मग या पैशाचा सदुपयोग समाजातील सर्वसामान्य अशा लोकांसाठी केला तर ? मग गुंजाळ यांनी गावातीलच मध्यमवर्गीय असलेल्या काही कुटुंबांना या रकमेतून दिवाळीचा किराणा, फराळ, मिठाई आणि कपडे भेट स्वरूपात दिले. अन गरिबांची दिवाळी गोड करत एक आदर्श घालून दिला आहे. त्यांनी हे पैसे स्वतः जवळ न ठेवता, गरीब कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी वापरले. त्यांनी गरजू महिला, वयोवृद्ध कुटुंबांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद फुलवला. त्यांच्या या सामाजिक आणि दयाळू कृतीचे समाजातून भरभरून कौतुक होत आहे.
अशा प्रकारच्या प्रेरणादायी कृतींमुळे समाजात आजही कुठे तरी मानवता जिवंत असल्याचे या घटनेतून दिसून आले. असे अनेक कुटुंब आपल्या सभोवती असतात त्यांच्या आनंदाच्या क्षणाचे आपणही सहयोगी बनुयात !
यंदाची दिवाळी ठरली आगळ्या वेगवेगळ्या भेटीची !
वेगळ्या भेटीतून वेगळच काही घडत असतं. अशीही एखादी भेट आयुष्यात घडू शकते ? याची कल्पनाही आम्हाला नव्हती ! सापडलेल्या पैशातून आमचीही दिवाळी गोड झाल्याची भावना सुशीला धनवटे, सिंधूबाई गुंजाळ आदि महिलांनी व्यक्त केली. यंदाच्या दिवाळीला आलेला अनुभव हा प्रत्येक दिवाळीला आठवण देणारा राहील अशा भावना व्यक्त करताना त्या महिलाही खूपच भावूक झाल्यात.
