वारंघुशी फाटा रोखला; आदिवासी महिला, ग्रामस्थ आक्रमक; भरपावसात आदिवासींचा जत्था उतरला रस्त्यावर, वाहनाच्या रांगाच रांगा ,अवैध दारू विरोधात वाड्या वस्त्यांने फुंकले रणशिंग ; अधिकारी म्हणाले यापुढे आम्हीच जबाबदार ; अखेर दिले लेखी आश्वासन ;
अकोले : प्रतिनिधी
गेली वीस वर्षापासून राजूर ग्रामपंचायती मध्ये दारूबंदीचा ठराव पास होवूनही या भागात हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामीण भागात सर्रासपणे अवैध दारू, गांजा विक्री होत असल्याने अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील महिला ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून वारंघुशी फाटा येथे संसाराची नासाडी करणाऱ्या तसेच अवैध धंद्यांच्या विरोधात नशाडीना कायमचा धडा शिकविण्यासाठी आदिवासी महिलांनीच रस्ता रोखत भरपावसात एल्गार पुकारला.

रविवार दि ८ सकाळी नऊ वाजता वारंगुशी फाट्यावर जहागीरदारवाडी, पेंडशेत, चिचोंडी, रंधा, बुळवाडी, पेसा ग्रामपंचायती मधील शेकडो ग्रामस्थ नागरिक आदिवासी महिला रस्त्यावर उतरत तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोखल्याने दोन्ही बाजूंचे रस्ते जाम होत, वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
दारू गांज्याची अवैद्य विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा. महिलांचा संसार उध्वस्त करणारा तळतळाट आहे. पंचक्रोशीतील गावे, वाड्या वस्त्या एकत्र येत वारंघुशी फाट्यावर शेकडो आदिवासी महिला ग्रामस्थ एकत्र येत न भूतो न भविष्यती असा आक्रोश यावेळी पहावयास मिळाला. सुस्तावलेल्या स्थानिक प्रशासनावर राग व्यक्त करत अनेक दिवसांपासून पोलिस आणि आमदारांना निवेदन देऊनही दुर्लक्ष करीत असल्याचे महिलांनी सांगितले. आदिवासी भागातील महिला, सरपंच, कार्यकर्ते, नागरिक यांनी तब्बल दोन तास रस्ता रोको करत एक उग्र आंदोलन केले. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही स्वतः पुढाकार घेवून येथील नशाखोरी बंद करू असा सज्जड इशारा या महिलांनी दिला.

रविवार असूनही पर्यटकांसाठी वाहतूक बंद ;
एकीकडे गणपती विसर्जना नंतर विश्रांतीसाठी अनेक पर्यटक भंडारदर्याच्या दिशेने निघाले होते. परंतु वारंघुशी फाट्यावर रस्ता रोको असल्याने या पर्यटकांचा हिरमोड झाला. तसेच रस्त्यावर वाहनाच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून आल्या. तब्बल दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला.

यांनी केले नेतृत्व ;अकोले तालुक्यातील राजुर परिसरातील अनेक छोटे गाव वाड्यावस्त्या, सरपंच, उपसरपंच महिला ग्रामस्थ एकत्र येत या आंदोलनाचे नेतृत्व केले.

अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन ;
उत्पादन शुल्काचे सुनील समसबुध्दे यांनी महिलांच्या मागण्या मान्य करत लेखी पत्र देत धंदा बंद करण्याचे आश्वासन दिले. एवढेच नव्हे पुढे होणारी जबाबदारी आमची राहील असा ठाम विश्वास या आदिवासी भगिनींना अधिका-यांनी दिला. यावेळी राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, अकोल्याचे निवासी तहसीलदार के आर लोहारे आदि उपस्थित होते. या अधिका-याकडून अवैध दारू थांबवण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतरच रास्ता रोको थांबवण्यात आला.
पाठिंबा अन मागण्या
दारूबंदी आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट वसंतराव मनकर यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.

अशा आहेत मागण्या
याप्रसंगी अनेक महिलांनी दारूमुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले. कर्तापुरुषच गेल्याने कुटुंबाची वाताहात झाल्याची व्यथाच या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आली. उत्पादन शुल्क अधिकारी यांच्या समोर हेरंब कुलकर्णी यांनी मागण्या मांडल्या..वारंघुशीसह आजूबाजूच्या ज्या ज्या गावात अवैध दारू विक्री सुरू आहे ती त्वरित बंद करा, विक्रेत्यांवर गुन्हे दाखल, तडीपार करा, उताऱ्यावर दंड अकारावा, बीट अंमलदारावर कारवाई करून बदली करा, शेंडी भंडारदरा येथील परवानाधारक दुकानाचे ऑडिट करून दुकान सील करा, राजूर हे दारूबंदीचे गाव असल्याने आदिवासी गावांचे मुख्य केंद्र असल्याने पोलीस निरीक्षकाची नेमणूक करा,तर ॲड वसंत मनकर म्हणाले आम्ही गरिबांच्या दारू विरोधात संघर्ष करतो केवळ पंटरवर केसेस न करता मूळ मालकांवर गुन्हे दाखल करा अशी आग्रही मागणी लावून धरली. वारंघुशी च्या सरपंच फसाबाई बांडे उपसरपंच समीर मुठे यांनी जनतेच्या संयमाची अंत पाहू नका अन्यथा गावागावांतील लोक अवैध दारूचे धंदे उद्ध्वस्त करू संताप व्यक्त करत खमक्या इशाराच या महिलांनी दिला.
यांचाही होता सहभाग
प्रकाश कोरडे, विलास कडाळी, कमल घाणे, दीपक भागडे, अनंत घाणे, तसेच गावातील महिला ग्रामस्थ तरुण रंधा गावचे सरपंच सुंदरलाल भोईर, जहागीरदार वाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे, पेंडशेत गावचे सरपंच सोमनाथ पदमेरे, चिंचोडी गावच्या सरपंच कविता मधेसह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.
