धरण परिसरात नाल्यात महिलेचा सांगाडा आढळल्याने खळबळ; खून की आत्महत्या? तपासाला आव्हान तीन ते चार महिन्यापासून मृतदेह जागेवर
अकोले ( प्रतिनिधी )
भंडारदरा धरणाच्या पायथ्याला शनिवारी (दि. १३ डिसेंबर) अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील महिलेचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान राजूर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. भंडारदरा धरणाच्या पायथ्याला, वनविभागाच्या कार्यालया जवळील महादेव मंदिर परिसरातील एका नाल्यात हा सांगाडा आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, हा सांगाडा सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वीपासून याच ठिकाणी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. महिलेच्या अंगावर टॉप असून कंबरेला निळ्या रंगाची लेगिंन्ज असल्याचे दिसून येते. कपडे कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी संभाजी सांगळे, महिला कर्मचारी सुवर्णा शिंदे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पुढील तपासासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर मुंबईद्याची अद्याप कोणतीही ओळख पटली नसल्याने राजूर प़लिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.