आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे स्मारकाची विटंबना; आदिवासी समाज आक्रमक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोले : प्रतिनिधी
तालुक्यातील देवगाव येथील आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची ठेकेदाराकडून विटंबना झाल्याप्रकरणी दोन ठेकेदारां विरुद्ध राजुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूर पोलिस ठाण्यात मोठया प्रमाणावर आदिवासी समाजाचे नेते व कार्यकर्ते एकत्रित आले होते. त्यामुळे काही वेळ तमावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच संबधित ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे परिस्थिती निवळली.
क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचे अकोले तालुक्यातील देवगाव येथे स्मारक आहे . आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे हे महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असुन ठेकेदाराकडून झालेल्या प्रकाराबद्दल आदिवासी बांधवांच्या भावनेला ठेच पोहचली आहे. परिसरात सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू होते . त्यावेळी हे काम करणारे ठेकेदार शैलेश गणपत पांडे , रा.अकोले व कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले रा. पाडाळणे यांनी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे नुकसान करत त्यांची प्रतिमा ही बाजूला काढून ठेवली . सदर प्रकार हा धामणवन येथील पोपट काळू चौधरी या आदिवासी युवकाच्या निदर्शनास आला.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे दर्शनासाठी मी आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर दुपारी ४ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे गेलो असता मला पुतळा नेहमीच्या ठिकाणी दिसला नाही व पुतळ्याचे चबुतरा तोडून त्याचे नुकसान करून त्या ठिकाणी खड्डा केलेला दिसून आल्याने मी तेथे काम करत असलेल्या कामगारांना पक्का पुतळा कोणी काढला व तो कोठे ठेवला आहे याची विचारपूस केली असता पुतळा हा मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी ठेकेदार पांडे यांच्या सांगण्यावरून काढून तो राघोजी भांगरे यांचे सभागृहात ठेवलेला असल्याचे सांगितले गेले.
त्यानंतर मी सभागृहात जाऊन पुतळा पाहिला असता पुतळा हा सभागृहात सुस्थितीत गलिच्छ ठिकाणी ठेवलेला दिसून आला. व त्यावेळी मी सचिन धोंडू भांगरे ,दत्तात्रय भिवा भांगरे, मुरलीधर नानाजी भांगरे यांना बोलावून घेऊन ठेकेदार पांडे यांचे कडे विचारणा केली की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पक्का पुतळा सदर ठिकाणावरून काढण्याची परवानगी आहे अगर कसे विचारले, त्यावेळी ठेकेदार पांडे यांनी काहीही एक माहिती न दिल्याने आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये सदर बाबत चौकशी केली असता आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडून समजले की, सदर ठिकाणचे फक्त सुशोभीकरणाचे काम आमच्याकडून होत आहे. पुतळा काढण्यासंदर्भात आम्ही ठेकेदार यांना कुठलीही परवानगी दिलेली नाही.
त्याचवेळी मी व माझ्या सोबत असणाऱ्या लोकांची खात्री झाली की दि. ९/९/२५ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले रा.पाडळणे, तालुका अकोले, व ठेकेदार शैलेंद्र गणपत पांडे रा. अकोले यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पक्का पुतळा हा मूळ ठिकाणाहून काढण्याची त्यांना कुठली परवानगी नसताना तसेच पक्का पुतळा कोणत्याही शासकीय अधिकारी यांची परवानगी न घेता आमच्या आदिवासी महादेव कोळी समाजाच्या आराध्य दैवताचा अपमान विटंबना करण्याचे उद्देशाने जाणीवपूर्वक पुतळा मूळ ठिकाणाहून काढून तो सभागृह ठेवून त्याची विटंबना करून पक्क्या पुतळ्याचे चबुतऱ्याचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
धामणवन येथील पोपट चौधरी यांच्या फिर्यादीवरून ठेकेदार शैलेश गणपत पांडे , रा.अकोले व कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले रा. पाडाळणे यांच्या विरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान शनिवार दिनांक १३ सप्टेंबर राजुर येथे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची झालेली विटंबनेबद्दल सर्व आदिवासी समाज एकत्र येणार असुन दोषींवर जन्मठेपेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपस्थित आदिवासी बांधवांकडून करण्यात आली आहे
.

