पोलिस सोमनाथ फापाळे अनंतात विलीन ; शासकीय इतमामात मुखाग्नी; लिंगदेव शोक सागरात डुंबला
अकोले :भारत रेघाटे
तालुक्यातील लिंगदेव येथील पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ फापाळे यांचा मृतदेह नवी मुंबई निवासस्थानाच्या जवळच असलेल्या खाडीत कुजलेल्या आवस्थेत मृतदेह आढळून आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. गांवकरी तसेच नातेवाईकांनी बेलापुर सीपी कार्यालयावर मोर्चा नेल्यानंतर तपासला पुढे गती मिळाली असे सूत्राकडून समजले.

गणपती उत्सव बंदोबस्तासाठी असणारे पोलीस सोमनाथ फापाळे हे 4 सप्टेंबरची ड्युटी करून सकाळी आपल्या पत्नीला फोन करून सांगितले की, माझा फोन स्विच ऑफ होणार आहे. मी फोन चार्जिंग करून परत फोन करतो हा शेवटचा फोन पत्नीला झाला. त्यानंतर त्याचा फोन आलाच नाही ना त्याची कुठे भेट झाली. गेल्या 20 -22 दिवसापासून नातेवाईक व पोलीसांनी त्यांचा शोध घेतला असता त्याचे शूज, गाडी, हेल्मेट सापडले.

अखेर त्यांचा मृतदेह पूर्ण कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने ओळख पटणे अशक्य झाले होते. सोमनाथची पत्नी वैशाली व नातेवाईकांनी डीएनए टेस्टची मागणी केली त्यानंतर तीन दिवसांनी रिपोर्ट आला. शेवटी मृतदेहाची ओळख पटली. घटनेची खात्री पटताच फापाळे कुटुंबांंनी एकच टाहो फोडला. शव ताब्यात घेऊन शनिवारी त्यांच्या गावी आणण्यात आला. लिंगदेव ग्रामपंचायत सरपंच अमित घोमल , लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष डी.बी फापाळे, पोलिस पाटील गणेश पवार अकोले पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी श्रद्धांजली वाहिली. शनिवार दि. 27 ला सकाळी 10:30 वाजता लिंगदेव येथे अहिल्यानगर, अकोले पोलीस प्रशासनाने मानवंदना देत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अग्निसंस्कार करण्यात आले.

पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ फापाळे हे 2014 साली पोलिस दलात नवी मुंबई रबाळे मध्ये रुजू झाले होते. अत्यंत शिस्तप्रिय असणारे सोमनाथ अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपल्या स्वतःच्या मेहनतीवर पोलीस दलात रुजू झाल्याने आई वडील बहिण यांना खूप मोठा आनंद झाला होता. गावातील तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.

पोलिस फापाळे यांच्या आकस्मित निधनाने लिंगदेव गाव व अकोले तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी वैशाली, दोन बहीण,चुलते, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. मुंबई पोलिस कॉन्स्टेबल अमोल फापाळे यांचे चुलत भाऊ होत.
