लाखों रूपयाच्या ट्रॅक्टर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश ; पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तब्बल ७१ लाख ७० हजारांचे ९ ट्रॅक्टर व २ दुचाकी जप्त दोघे गजाआड
संगमनेर ( प्रतिनिधी )
शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची ट्रॅक्टर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल ७१ लाख ७० हजार किंमतीचे ९ ट्रॅक्टर आणि २ दुचाकी जप्त करण्यात आले असून दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेर तालुका पोलिसात पत्रकार परिषदेत दिली.

फसवणुकीचा सूत्रधार भालचंद्र आशोक सावळे (रा. पारनेर) व त्याचा साथीदार सुनिल भांडवलकर (रा. अहमदनगर) यांनी एल अँड टी फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांच्या नावावर कर्जावर ट्रॅक्टर घेतले आणि ते थेट विक्रीस काढले. या रॅकेटचा पसारा अहमदनगर, नाशिक, पुणे आणि बीड जिल्ह्यांपर्यंत पसरलेला असून आरोपींनी महिंद्रा, फार्मट्रॅक, पॉवरट्रॅक आणि आयशर ब्रँडच्या ट्रॅक्टरच्या खरेदी विक्रीतून लाखोंचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले.
जप्त वाहने
९ ट्रॅक्टर आणि २ दुचाकी, एकूण किंमत ७१, ५०,००० सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे , पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईने फसवणुकीच्या साखळीचा फडशा पाडला असून, कृषी कर्ज योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम ३१६ ( २ ) ३१८ ( ४ ) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊन सरकारी योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या या टोळीने ट्रॅक्टर विविध ठिकाणी विकण्याचा प्रयत्न केला होता. विकत घेणाऱ्या काही व्यक्तींनाही चौकशी साठी बोलावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व ट्रॅक्टर पूर्वेकडील तालुके व जिल्ह्यातून जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पथकात राजूर पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, दादासाहेब लोंढे, सचिन धनाड, संदीप दरंदळे, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाडे, दत्तात्रय मेंगाळ, बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे, सागर काळे, संदीप उदावंत आणि किरण शिंदे यांनी सहभाग घेतला. पोलिस सूत्रांनी सांगितले की, या आरोपींनी काही शेतकऱ्यांना आर्थिक जाळ्यात ओढल्याची शक्यता असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊन त्यांचे ट्रॅक्टर चोरीला गेलेले आहे त्यामुळे मालकाच्या तपास घेऊन कागदपत्राचे पूर्तता करून त्यांना हे ट्रॅक्टर परत केले जाणार असल्याचे पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

