इनोव्हा दुचाकीचा भीषण अपघात; तिघेजण गंभीर जखमी
अकोले :
रस्त्यातील खड्डे चुकवण्याच्या नादात एक दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या इनोव्हा गाडीवर थेट जाऊन धडकला. कोल्हार घोटी राज्यमार्गावर अकोले ~राजूर रस्त्यावरील पथिक पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा साडे सहा दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत, तिघेही जखमी हे रुंभोडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर अकोले येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रामचंद्र मेंगाळ, वृषाली कडाळी व रोहिणी मेंगाळ अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. यापैकी रामचंद्र मेंगाळ हे गंभीर जखमी झाले आहेत तर वृषाली कडाळी या तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून. रोहिणी मेंगाळ यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातातील इनोव्हा अंबड येथील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची असल्याचे समजते. अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अकोले पोलीसात कोणत्याही स्वरूपाची गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
