ब्रेकिंग न्यूज :
भारत

अबब ! एवढ्या आणि अशा पण भाज्या असतात का ग आई !!

Blog Image
एकूण दृश्ये: 509

अबब ! एवढ्या आणि अशा पण भाज्या असतात का ग आई !! नव्या पिढीने न ऐकलेल्या, न पाहिलेल्या रानभाज्यांचा महोत्सव ;                               उमेदचा पुढाकार

रानभाज्याने केले अकोले महोत्सवात रेकॉर्ड ; बचत गटाने बनवलेले पदार्थ केले फस्त 

 { तेरे, हामद, भारंगी, चितप, चाई, कोळू दुर्मिळ भाज्यांचे स्टॉल }

     अकोले  { भारत रेघाटे }

         कोळू, कुरडू, आळु, चाई, भारंगी चिचूर्डा, बडदा, कोडवळे, पात्री, शेवगा, राजगिरा, फांदभाजी, कोंबड्या, चित्रकाची, हामद, अंबाडी, आघाडा, चितप, लोथी, भोकर, मोहटी, तेरे, अमरकंद, पुदीना, कानावर कधी न पडलेल्या भाज्या निसर्गतः उगवलेल्या अति दुर्मिळ रानभाज्यांचा एक दिवसीय अनोख्या महोत्सव अकोले शहरात भरवण्यात आला होता.

         अतिथी मान्यगणांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उमेदच्या पुढाकाराने महिला बचत गटा मार्फत हा एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, प्रभारी गटविकास अधिकारी विकास चौरे, बाजार समितीचे सभापती भानुदास तिकंडे, हेरंब कुलकर्णी, एकल साऊच्या प्रतिमा कुलकणी, पुष्पा लहामटे, उमेद चे तालुका व्यवस्थापक कुंदन कोरडे , सोमनाथ गुंजाळ, प्रभाग समन्वयक कुलदीप पाटील अमोल कोळी आदि उपस्थित होते. आमदार किरण लहामटे, आदिंनी या रानभाज्याचा आस्वादही घेतला.

अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगर, दऱ्या खोऱ्यांमध्ये निसर्गतः उगवलेल्या रानभाज्यां, रानमेव्यानी अकोले पंचायत समितीचा परिसर बहरून गेला होता. कोणतीही शेती न करता अथवा कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता, भाज्याना 'रानभाज्या" म्हणतात. या भाज्या जंगलासह शेताच्या बांधावर, माळरानावर उगवतात. पावसाची रिप- रिप सुरू झाली की, रानभाज्या डोलु लागतात. भाज्यांच्या चवीसह औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवित नाहीत. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात रानभाज्या आवर्जून चवीने खाल्ल्या जातात. रानभाज्याचे महत्व लक्षात यावे यासाठी अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील गावामध्ये रानभाज्याचे महोत्सव भरविले जातात. अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्य, रतनगड, अलंग, मलग, कुलंग, कोकणकडा, बिताका आदी परिसरात जून, जुलै, व आँगस्ट महिन्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवतात.

----- Advertisements -----

बारी, उडदावणे, मुतखेल, राजूर, कोतुळ, अकोले शहरात आदिवासी बांधव या भाज्यांची विक्री करतात. निसर्गप्रेमी, हौशी पर्यटक व शहरी नागरिकांना माहिती नसलेल्यांना विविध प्रकारच्या या रानभाज्याची माहिती ते सांगतात.रानभाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडून आदिवासी महिला शहरी भागात बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात, मात्र या रानभाज्यांची माहिती नसल्याने फारसे कोणी विकत घेण्यास लवकर तयार होत नाही. ज्याना माहिती आहे अशीच व्यक्ती भाज्या विकत घेताना दिसतात.

रानभाज्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे इच्छा असुनही बाजारात त्या विकत घेतल्या जात नाहीत. यामुळे रानभाज्या विकत घेताना शक्यतो स्थानिक आदिवासी कडूनच घ्याव्यात त्यांच्या कडून रानभाज्यांविषयी अचूक माहिती मिळते या भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या असतात. त्यांना खते वापरलेली नसतात आदींनी रानभाज्यांचे महत्त्व समजून घेत त्या खरेदी केल्या.

----- Advertisements -----

पंचायत समिती अकोले तालुका पंचायत समितीच्या आणि उमेद अभियानांतर्गत रानभाज्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेद तालुका अभियानाचे व्यवस्थापक कुंदन कोरडे, सोमनाथ गुंजाळ प्रभाग व समन्वयक कुलदीप पाटील अमोल कोळी सीआरपी कृषी सखी पशु सखी ग्राम संघ आदिचे मोलाचे योगदान लाभले.  

 *रानभाज्याचा आस्वाद घेण्यासाठी उडाली झुंबड.* 

--- या ठिकाणी रानभाज्या बरोबरच लोणचे, पापड, आदिंचेही बचत गट उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले होते. रानभाज्यांचा मेनू बनवण्यात आले. अनेकांना रेसिपीच्या माध्यमातून भाज्या कशा बनवल्या जातात त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. एकूणच मनाला भावणारे सादर सादरीकरण बचत गटांच्या वतीने करण्यात आले. बनवलेल्या रानभाज्यांचा नागरिकांनी आस्वाद घेण्यासाठी झुंबड उडाल्याने दोन तासात रानभाज्याचे स्टॉल नागरिकांनी खरेदी करत फस्तही केलेत. या महिला मेळाव्यात अतिथीच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने नारी भवनात प्रभाग संघाचा शुभारंभ करण्यात आला. गेली दोन दिवसा पासून रानभाज्या महोत्सवाचे कौतुक अकोलेकरांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

----- Advertisements -----

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम