माळीझाप अकोले येथून मढी यात्रेसाठी पालखी व काठीचे पारंपरिक प्रस्थान ; ७ तारखेला मढीत होणार स्वागत
अकोले (प्रतिनिधी)
अकोले शहरातील माळीझाप परिसरातून श्री कानिफनाथ महाराजांच्या मढी यात्रेसाठी निघणाऱ्या पालखी व काठीच्या पदयात्रेला मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीपासून सुरू होणाऱ्या श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी ही पारंपरिक पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान झाली. माळीझाप येथील अनेक वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. होळीच्या दिवशी सकाळी काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी होळी प्रज्वलित झाल्यानंतर डफ, ढोल आणि ताशांच्या गजरात काठीची पुन्हा मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावकरी, तरुण मंडळे तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुषांच्या हस्ते पालखी रथ आणि काठीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर “जय कानिफनाथ”च्या जयघोषात पालखी पदयात्रेला सुरुवात झाली. मढी यात्रेत माळीझाप अकोले येथील पारंपरिक डफ काठीला विशेष धार्मिक मान दिला जातो. रंगपंचमीच्या दिवशी या काठीचे मढी येथे होणारे आगमन यात्रेतील अत्यंत महत्त्वाचा आणि भाविकांसाठी उत्सुकतेचा धार्मिक सोहळा मानला जातो. त्यामुळे माळीझाप गावासाठी ही पदयात्रा श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा अभिमानाचा क्षण ठरतो.
ही पालखी पदयात्रा अकोले, संगमनेर, लोणी, कोल्हार, टाकळीमिया, आरडगाव, शनिशिंगणापूर मंदिर, घोडेगाव आणि मिरी मार्गे प्रवास करत रंगपंचमीच्या आदल्या दिवशी तिसगाव येथे मुक्काम करणार असून त्यानंतर श्री क्षेत्र मढी येथे पालखी सोहळ्याचे आगमन होणार असल्याची माहिती मच्छिंद्र मंडलीक, प्रमोद मंडलिक यांनी दिली.

