राजूर ते अहिल्यानगर भव्य लाँग मार्च 24 फेब्रुवारीला ऐतिहासिक पायी मोर्चा
अकोले (प्रतिनिधी)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा तसेच सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या वतीने शेतकरी, कर्मचारी, कामगार व श्रमिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 24 फेब्रुवारी 2026 रोजी राजूर येथून अहिल्यानगरपर्यंत भव्य पायी लाँग मार्च काढण्यात येणार आहे.
राजूर, अकोले, संगमनेर आणि लोणी मार्गे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येणार असून या ऐतिहासिक लाँग मार्चमध्ये शेतकरी व कामगारांच्या विविध प्रश्नांसह मागील लाँग मार्चवेळी पालकमंत्र्यांनी दिलेल्या अपूर्ण आश्वासनांचा मुद्दा तसेच नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पा संदर्भातील भूमिका मांडण्यात येणार आहे.
या लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर 22 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. प्रारंभी सायंकाळी 5 वाजता तहसील कार्यालय प्रांगणात होणारी ही परिषद प्रशासनाच्या बैठकीमुळे बदलण्यात आली आहे.
दरम्यान, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता अकोले तहसील कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या उपस्थितीत लाँग मार्चच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद तहसील कार्यालय प्रांगणात पार पडणार असल्याची माहिती जिल्हा सचिव कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी दिली आहे.

