बिबट्याचे पिल्लू मृत्यू वन्यजीव संरक्षणावर प्रश्नचिन्ह ; शॉक लागला की आजाराने मृत्यू ? सुगाव नर्सरीतील घटना
अकोले ( प्रतिनिधी )
तालुक्यातील सुगाव येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत गुरुवारी (दि. १२) दुपारी तीन ते चारच्या सुमारास सात ते आठ महिन्यांचे बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
अकोले तालुक्यातील सुगाव येथील रोपवाटिका वनविभागाच्या ताब्यात असून येथे पकडलेले बिबटे ठेवले जातात. असे असतानाही पिल्लाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत वनविभागाकडे ठोस माहिती नसल्याने वन्यजीव संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संगमनेर अकोले परिसरात नदीकाठ व शेतीचा विस्तार मोठा असल्याने काही महिन्यांपूर्वी बिबट्यांचा वावर वाढला होता. मात्र ऊस व गिनी गवत काढून टाकल्याने लपणक्षेत्र कमी झाले असून बिबटे नदी व पाणवठ्याजवळ विसावा घेत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत अधिक दक्षता अपेक्षित असताना, वनविभागाच्या नर्सरीतच बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळणे चिंताजनक मानले जात आहे.
सदर पिल्लाला शॉक लागला, निमोनिया झाला किंवा अन्य आजारामुळे या पिल्लाचा मृत्यू झाला, याबाबत संभ्रम असून अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद पाटील हे कार्यालयीन कामासाठी दिवसभर जिल्हा न्यायायालयात होते. ते म्पहणाले की, शुवैद्यकीय अहवाला नंतरच माहिती स्पष्ट होईल, असे सांगितले. या नर्सरीत वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब जाधव व वनरक्षक एस. बी. पराते कार्यरत आहेत.
दरम्यान शुक्रवारी (दि. १३) सकाळी शवविच्छेदन होणार असून त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. मात्र तोपर्यंत वनविभागाच्या देखरेख व कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे
.

