ब्रेकिंग न्यूज :
भारत

राजूरचा पाणी संघर्ष पेटणार! धरण उशाला, कोरड घशाला; आमदाराच्याच गावातील भीषण वास्तव ,आमदाराची गोड वाणी; मिळत नाही काही मिनिटेही पाणी

Blog Image
एकूण दृश्ये: 385

राजुरचा पाणी संघर्ष पेटणार ! धरण उशाला, कोरड घशाला; आमदाराच्याच गावातील भीषण वास्तव ,आमदाराची गोड वाणी; मिळत नाही काही मिनिटेही पाणी 

   राजूर ( भारत रेघाटे )    

           राजूर गावाचा पाणीप्रश्न हा विकासाचा नव्हे तर थेट जनतेच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न बनला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे गेली ५०–६० वर्षे योजना झाल्या, निधी आला, पाहण्या झाल्या, अर्धवट योजना झाल्या मात्र राजुरकरांच्या नशिबी २५–३० मिनिटे पाणीही क्वचितच मिळते नळपाणी योजना आहेत, पण पाणी नाही ही स्थिती लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याच गावात आजही पाणी प्रश्न आ करून उभा आहे.

         1975 साली बारव व घमडी विहिरीवर अवलंबून असलेल्या गावात पहिली नळपाणी योजना सुरू झाली. 1995 साली स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून दुसरी योजना राबवली गेली. मात्र चढ उताराचे गाव, वाढती लोकसंख्या, अपुरी क्षमता, पाईपलाईन लिकेज, बोगस कनेक्शन, वारंवार मोटर जळणे आणि ग्रामपंचायतीचा नियोजनशुन्य व ढिसाळ कारभारामुळे ही योजना कधीच पूर्ण क्षमतेने चालली नाही.

         दरम्यानच्या काळात जलजीवन योजनेचा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन टाक्या व काही गावा अंतर्गत पाईपलाईन बदलण्यात आल्या. मात्र त्या कामाच्या दर्जामुळे प्रत्यक्ष पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल अशी खात्री गावातील नागरिकांना अजिबात नाही. पाहणीसाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी येतात, आश्वासने देतात; पण "पाणी प्रश्न मात्र जैसे थे" च आहे. ग्रामपंचायतीत सकारात्मक कृतीचा अभाव, पारदर्शकतेचा प्रश्न यामुळे नागरिकांचा विश्वासच राहिला नाही. नागरिकांना पाणी मिळत नाही अथवा जे मिळते त्यातही मात्र अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. भंडारदरा धरण, निळवंडे धरण ( पिंपरकणे पुलाजवळील उदभव व दिगंबर नदी पात्रातील उदभव )असे पाण्याचे स्रोत काखेत असूनही राजुर तहानलेलेच आहे.

        राजुर ही महाराष्ट्रातील पेसाची सर्वात मोठी ग्रामपंचायत आजही येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो ! ही अत्यंत वेदनादायक व संतापजनक बाब आहे. आजूबाजूला असलेल्या तब्बल ४० खेड्यांचे शैक्षणिक, आर्थिक तसेण बाजारपेठ दैनंदिन जीवनच राजुरवर अवलंबून असताना, भंडारदरा धरण २० कि.मी, निळवंडे धरण ३ कि. मी. असूनही स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटून गेल्यावरही माणूस आणि जनावरांना पिण्याचे पाणी मिळू नये हे नियोजनाचे अपयश दर्शवते. राजुरकडे केवळ आकड्यांतून नव्हे तर मूलभूत सुविधांमधूनही गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे.

            भंडारदर्‍यातून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची ठोस योजना तातडीने राबवणे ही काळाची गरज आहे, शेजारच्या संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणातून ५० किमीवरून पाणी आणले जाते,मग राजुरसाठी का नाही ? असा सवाल ॲड कैलास येलमामे यांनी उपस्थित करत दररोज ठरावीक वेळेत शुध्द पाणी इतकीच राजुरकरांची माफक अपेक्षा लोकप्रतिनिधीं कडून पूर्ण व्हावी ही आहे. राजुरचा पाणी प्रश्न हा अतिशय गंभीर स्वरूपाचा दीर्घकालीन समस्या आहे मात्र आंदोलने, मोर्चे होऊनही प्रश्न सुटलेला नाही. उलट आंदोलनकर्त्यांना अडचणीत आणण्याचे काम केले जाते. त्यांचे वर रोष व आकस धरला जातो ही दुर्दैवाची बाब आहे. 

        आता उन्हाळ्याची चाहूल लागली असताना राजुरचा पाणीप्रश्न कधी सुटणार ? आजही गावात खासगी टँकरराज जोमात असून, मागील काळात अशुद्ध पाणी पुरवठा व लिकेजमुळे काविळ साथीचा आजार मोठ्या प्रमाणात बळावला गेल्याने राजुरकरांना मोठ्या प्रमाणात त्याची झळ सोसावी लागली.पाणी प्रश्न हा आता केवळ मागणी राहिलेला नसून, जाब विचारणाऱ्या संघर्षाचे रूप घेत राजूरचे पाणी चांगलेच पेटणार असल्याचे दिसते. 

----- Advertisements -----

याविषयी किरण माळवे म्हणाले की, राजूर ग्रामपंचायतीत प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने जनतेच्या पैशांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असून, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. केलेली विकासकामे गुणवत्तेच्या निकषांवर तपासून प्रत्यक्ष मोजमाप क्रॉस पद्धतीने करावे व दक्षता पथकाकडून चौकशी व्हावी. पाणीपुरवठा योजनेत अपप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे बोजवारा उडाला असून, काही कर्मचारी जाणूनबुजून योजना बंद ठेवून गावाला वेठीस धरत आहेत हे थांबवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

संतोष मुर्तडक म्हणाले की, स्वातंत्र्या- नंतर ७५ वर्षे उलटून गेली तरी माणूस आणि जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नसेल, तर ते थेट नियोजनाचे अपयश आहे. राजुरकडे केवळ कागदी आकडेवारीतून नव्हे, तर मूलभूत सुविधांच्या निकषावर गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. भंडारदर्‍यातून कायम स्वरूपी पाणीपुरवठ्याची ठोस व अंमलबजावणीयोग्य योजना तातडीने राबवणे ही काळाची गरज आहे. त्यातच काल दोन्ही मोटारी जळाल्याने शहरातील अल्प पाणीपुरवठाही ठप्प होणार असल्याची माहिती अधिकच चिंताजनक आहे. प्रशासनाने आश्वासनांवर न थांबता तात्काळ उपाययोजना करून राजुरकरांचा दीर्घकाळचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी ठाम मागणी केली आहे. राजूरकरांच्या हक्काच्या पैशांची लूट सहन केली जाणार नाही; अन्यथा जनआंदोलन करावेच लागणार असल्याचे समाजिक कार्यकर्त संतोष मुर्तडक, गणपत देशमुख, किरण माळवे सह नागरिकांनी आपल्या भावनाचाच उद्रेक व्यक्त केला.

शांतीसाठी संघर्ष करा, पण संघर्ष शांततेसाठीच असावा.

स्वामी विवेकानंद