रोहित्र फोडणारी टोळी जेरबंद; 15.65 लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे जिल्ह्यातील आरोपी, अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ; चौघे ताब्यात, दोघे फरार
अकोले (प्रतिनिधी)
तालुक्यातील राजूर परिसरात विद्युत रोहित्र फोडून कॉपर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. वारंवार घडणाऱ्या रोहित्र चोरीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत पोलिसांनी 15 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार आरोपींना अटक केली असून दोघे आरोपी फरार आहेत. कोहंडी (ता. अकोले) येथील धरणाच्या कडेला असलेले विजेचे रोहित्र 26 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. या रोहित्रातील 3.50 लाख रुपयांचे कॉपर चोरीला गेल्याची तक्रार राजूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा दाखल होताच तपासाला गती देण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुखरुप सुखदेव नांगरे (24, रा. हिवरे तर्फे, जुन्नर), सागर शिवराम जाधव, शैलेश बाळु पारधी (दोघे रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) व मोहंमद तल्हा मोहंमद जुबेर (रा. वाल्हेकरवाडी, पुणे) यांचा समावेश आहे. तर भास्कर केवळ व सुनिल खंडागळे हे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपींकडून 15 लाख 65 हजार रुपयांचे कॉपर तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार (एम.एच. 12 ई. एक्स. 4340) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या टोळीने राजूर पोलीस ठाण्यातील दोन तसेच शिरूर (जि. पुणे) येथील एक असे एकूण तीन गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्यासह पोलीस अंमलदार विजय पवार, संतोष खैरे, गणेश लोंढे, फुरकान शेख, अमृत आढाव, योगेश कर्डीले व महादेव भांड यांचा समावेश होता.
पथकाने पुणे व नाशिक जिल्ह्यात शोधमोहीम राबवत नारायणगाव (ता. जुन्नर) परिसरात मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत त्याच्यासह आणखी तिघांना अटक करण्यात आली.अटक आरोपींना मुद्देमालासह राजूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

