ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रा शं. ना. नवलगुंदकर वैकुंठात लीन ; सभ्यता आणि संस्कृतीला आम्ही पोरके झालो
संगमनेर { भारत रेघाटे }. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, राज्यशास्त्र, अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. शं. ना . नवलगुंदकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 89 व्या वर्षी पुणे येथे देहावसान झाले. आज रविवार दि ६ जुलैला सकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालीन पुणे विद्यापीठ माजी प्रभारी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर हे मूळचे संगमनेर येथीलच होत. त्यांचे वडील संस्कृतचे अध्यापक होते. संगमनेर मधील पेटीट हायस्कूल मध्ये युवकांना त्यांनी संस्कृत भाषेचे धडे दिले. तर चिरंजीव प्रा डॉ. शं. ना नवलगुंदकर हे राष्ट्रीय स्वयं संघाचे ते वरिष्ठ पदाधिकारी होते. कट्टर हिंदुत्ववादाचा पगडा बालपणा पासूनच त्यांना मिळाला होता. सभ्यता आणि संस्कृतीने कोरले गेलेल्या पाठाचा नि विचाराचा पगडा शंकरराव यांच्यावर पडला आणि पुढे संगमनेरकरांचे शंकरशेठ झालेत. पेटीत शाळा आणि बाजारपेठत त्यांचे वास्तव्य होते. जयहिंद क्लोथ सेंटर येथे नवलगुंदकर राहत असत. पुढे महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या एचपीटी येथे झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी याच विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली. नोकरीच्या निमित्ताने या कुटुंबाचे उर्वरित आयुष्य पुण्यात गेले. एक राजकीय विश्लेषक, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, खर्डा प्रवक्ता म्हणून ते सर्वश्रुत होते. ''सभ्यता आणि संस्कृती' या पुस्तकाचा जन्म याच विचारधारेतून झाला . राजकारण, राजकीय विश्लेषण याबाबत अभ्यासपूर्ण परखड असे मत ते मांडत असत. डॉ. शं. ना यांना अवगत होती. त्यांच्या जाण्याने सभ्यता आणि संस्कृतीची पोकळी निर्माण झाल्याची भावना राजकीय आणि साहित्यक्षेत्रात उमटत आहे.
🔻शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष, डॉ. संजय मालपाणी त्यांच्या आठवणी विषयी सांगतात की, आदरणीय प्रा डॉ. शं. ना . नवलगुंदकर सरांचे वृद्धापकाळा मुळे निधन झाले… काळ कोणासाठीही थांबत नाही हेच खरे! जीवनाची पण एक ABCD असते. यातील B हा बर्थ चा आणि D डेथचा असतो. गीता सांगते - जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि।।2.27॥ जन्म झालेल्या चा मृत्यु अटळ असतो. पण प्राप्त आयुष्यात बर्थचा B आणि डेथच्या D मधला C मात्र आपल्या चॉईसचा असतो. आपण आपले आयुष्य कसे जगायचे याचा चॉईस आपला असतो. नवलगुंदकर सरांचे जगणे त्यांनी स्वतः ठरवून विद्यार्थी व समाजासाठी समर्पित केलेले होते. जे जे आपणांस ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करुन सोडावे सकल जन॥ या समर्थउक्ति प्रमाणे आयुष्यभर शिक्षक व निवृत्तीनंतर व्याख्याता म्हणून त्यांनी अव्याहत ज्ञानदानाचे व्रत अंगिकारले. मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य व पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू ही सन्मानाची पदे त्यांनी भुषविली. संगमनेरातील पेटीट हायस्कूलचा एक मेधावी विद्यार्थी म्हणून बालपणी सुविख्यात असलेल्या नवलगुंदकर सरांनी संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्षपद तब्बल १५ वर्षे भूषविले. त्यांचे शि. प्र. संस्थेच्या वार्षीक सभेतील प्रत्येक भाषण हे शिक्षणाची दिशा सांगणारे वास्तववादी व परखड विचारामृत असायचे. राज्यशास्त्राची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा अभ्यास हा त्यांच्या आवडीचा विषय होता. बदलत्या समाजमनाची उत्तम जाण त्यांना होती. अमोघ वक्तृवाची देणगी त्यांना प्राप्त होती. आपल्या अखंड अभ्यासातून आणि अनुभवांच्या समृद्धीमुळे त्यांच्या वक्तृत्वाला विषेश धार प्राप्त झाली होती. उत्तम वक्ता म्हणून महाराष्ट्रातील कानाकोप-यातून त्यांना बोलावले जायचे. महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय शिक्षकापासून समाज शिक्षकापर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. आयुष्यभर शिक्षकधर्म व्रतस्थ वृत्तीने जपणा-या डॉ. नवलगुंदकर सरांचे जीवन शिक्षण क्षेत्रात काम करणा-या प्रत्येकाला आदर्श वाटावे असे होते. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो या ज्ञानदेवांच्या पसायदानातील ओवीला सार्थ करणा-या निरपेक्ष वृत्तीच्या गुरुवर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…. 🔻विवेक मुळ्ये : दुःख व्यक्त करत सांगतात की, अंदाजे पन्नास वर्षांपूर्वी त्यांचं शिक्षण पेटीट हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा आणि आमच्या वडिलांचा घनिष्ठ संबंध होता. ते सातत्याने संगमनेरला येत असत. त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असल्याने फारसे बोलण्याचे धाडस झालेच नाही. वडील आणि मुलगा दोघेही शिक्षक होते एक प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व आज डोळ्याआड गेले. ते कायम स्मरणात राहतील. 🔻डॉ. संतोष खेडलेकर सांगतात की, प्रा . डॉ. शं. ना. नवलगुंदकरांचे जाणे हे मनाला चुटपुट लावणारे आहे. एक प्रभावी वक्त्यास आपण मुकला असून सरांचे व्याख्यान शेवटच्या क्षणापर्यंत जागेवर खेळवून ठेवणारे होते. 🔻प्रा. डॉ. श्रीनिवास भोंग आठवणी विषयी सांगतात की, 2005 ते 2011 पर्यंत ते शिक्षण प्रसारक चे अध्यक्ष होते. 'हेड्या' या पुस्तकात त्यांच्या वडिलांचे काही संदर्भ असल्याचे स्मरण करून देतात. राज्यशास्त्रा वरील अनेक पुस्तकापैकी त्यांच्या पुस्तकाचा नामोल्लेख केला जातो. एक संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांच्या पुस्तकाकडे बघितल्या जाते. पुणे विद्यापीठात प्राध्यापकांचे उजळणी वर्ग घेतले जात असत. त्यानिमित्ताने एक प्रभावी अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा अनुभव सांगितला. डॉ . नवलगुंदकर हे प्राध्यापकांचेही प्राध्यापक होते. 🔻पुण्याहून वीणा पेशवे सांगतात की, डॉ. शं. ना नवलगुंदकरांचे विश्वकोशा तील योगदान भरीव होते. त्यांच्या जाण्याने एक अभ्यासू व राजकीय विश्लेषक आणि व्याख्याता आपण गमावून बसलो.
