राज्यात ४१ वाघांचा मृत्यू; पेंच परिसरात एआय यंत्रणेद्वारे वाघ बिबट्यांवर ‘स्मार्ट’ नजर
मुंबई / नागपूर ( प्रतिनिधी )
देशात वाघांच्या मृत्यूची चिंताजनक आकडेवारी समोर आली असून २०२५ या वर्षात देशात एकूण १६६ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील ४१ वाघांचा समावेश असल्याची माहिती सरकारने विधान परिषदेत दिली. या पार्श्वभूमीवर वाघांचे संरक्षण मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने अतिसंवेदनशील जंगल भागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला असून पेंच परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आधारित सतर्कता यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून गावकऱ्यांचे संरक्षण आणि वाघ बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ही प्रणाली बसविण्यात आली आहे. संवेदनशील भागात बसविण्यात आलेल्या सेन्सर आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने वाघ किंवा बिबट्या आढळल्यास त्वरित अलर्ट वन विभाग आणि स्थानिक नागरिकांना मिळतो. त्यामुळे नागरिकांना वेळेवर सावध राहणे शक्य होत आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर रामटेक तालुक्यातील देवलापारजवळील पिपरिया गावात गुरुवारी रात्री वाघाच्या वावराचा इशारा मिळाला.
यंत्रणेने दिलेल्या सतर्कतेमुळे गावकरी तसेच वन विभाग तात्काळ सावध झाले आणि संभाव्य धोका टळल्याचे सांगितले जात आहे. सध्या तीन ठिकाणी ही प्रणाली बसविण्यात आली असून पेंच वन्यजीव क्षेत्रातील एकूण ४० संवेदनशील गावांमध्ये ती कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. मार्व्हल या संस्थेच्या पुढाकारातून ही एआय प्रणाली उभारण्यात येत असून १५ एप्रिलपर्यंत सर्व ठिकाणी ती सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी वाघांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी जंगल परिसरात विशेष गस्त वाढविण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डॉग स्क्वॉड, कॅमेरे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात डिसेंबर २०२५ मध्ये एक आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोन वाघांचा मृत्यू झाला होता. हे मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
एम स्ट्राइप्स प्रणाली असलेले मोबाईल उपलब्ध
वन विभागाने वाघांच्या संरक्षणासाठी एम स्ट्राइप्स प्रणाली असलेले मोबाईल वनकर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. या प्रणालीच्या मदतीने जंगलातील हालचालींची नोंद, गस्त आणि संशयास्पद घटनांवर तात्काळ नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे.वाघांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, अवैध शिकारींची माहिती मिळवण्यासाठी क्षेत्रस्तरावर खबऱ्यांची नियुक्ती अतिसंवेदनशील भागात बिनतारी संदेश यंत्रणा, नागपूर येथे वन्यजीव गुन्हे कक्षाची स्थापना, संवेदनशील भागात वाहनांची नियमित तपासणी, वाघ बिबट्यांच्या भ्रमणमार्ग व पाणवठ्यांवर कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर, वन विभागाच्या या उपाययोजनांमुळे वाघांचे संरक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एआय तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
