संगमनेर (प्रतिनिधी)
बिहार येथील मौलाना अब्दुला सलीम यांनी एका धार्मिक मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रीं बाबत कथितरीत्या केलेल्या वादग्रस्त व अश्लील वक्तव्याचा संगमनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप हिंदू सुरक्षा सेवा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात संगमनेर येथील संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून संबंधित मौलानावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात अशा प्रकारची चिथावणीखोर आणि अपमानास्पद भाषा वापरणे हे अत्यंत निंदनीय आहे. यामुळे समाजातील शांतता आणि सलोखा बिघडण्याची शक्यता असून अशा प्रकारच्या वक्तव्यांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सनातन हिंदू धर्माचे संत असून देशातील एक महत्त्वाचे लोकप्रतिनिधी आहेत. अशा व्यक्तीच्या कुटुंबाबद्दल अवमानकारक टिप्पणी करणे हे केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर समाजातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे संबंधित मौलानावर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक दाखवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशाराही दिला की, जर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्यात आली नाही, तर हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. समाजात शांतता आणि सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांवर तात्काळ लगाम घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे निवेदन देताना बजरंग दलाचे संगमनेर अध्यक्ष कुलदीप ठाकूर, प्रदेशाध्यक्ष डॉ. अभय बंगाळकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दादा गुंजाळ, जिल्हाध्यक्ष स्वातिक महाराज, संगमनेर शहर प्रमुख अमोल रणाते तसेच तालुका महिला अध्यक्षा मीनाताई डोके, किरण बिबवे, सुरेश कालडा, शरद शिंदे, शुभम कपिले आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित वक्तव्यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.
संत एकनाथ