संगमनेरमध्ये जुडवा बहीण भावासह चुलत बहीणीचा पहिला रोजा; संयम आणि श्रध्देचा सुंदर संदेश
संगमनेर ( भारत रेघाटे )
रमजान महिन्यात इस्लाम धर्मात रोजाचे अनन्य साधारण धार्मिक महत्त्व आहे. रमजान महिन्यात एक तरी रोजा करावा ठेवला जाणारा रोजा अत्यंत पवित्र मानला जातो. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी त्याग करून संयम पाळणे, प्रार्थना करणे, गरीब गरजूंना मदत करणे आणि आत्मशुद्धी साधणे हा रोजाचा मुख्य उद्देश असतो. रोजा माणसाला संयम, शिस्त, सहनशीलता आणि इतरांच्या दुःखाची जाणीव करून देतो. त्यामुळे रमजान महिन्यातील रोजे केवळ उपवास नसून आत्मिक शुद्धी आणि समाजातील बंधुभाव वाढवण्याचा संदेश देतात.
कडक उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असतानाही संगमनेर शहरातील तीन चिमुकल्या मुलांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवत धार्मिक श्रद्धेचा सुंदर आदर्श घालून दिला आहे.

संगमनेर येथील जुळी बहीण भाऊ हनी फातिमा सलमान शेख आणि अब्दुल हादी सलमान शेख (वय ६ वर्षे) तसेच त्यांची चुलत बहीण जुनेरा अरशद सैय्यद (वय ८ वर्षे) यांनी उत्साहाने पवित्र रमजानचा पहिला रोजा ठेवला. हनी फातिमा आणि अब्दुल हादी हे दोघे इयत्ता पहिलीत शिकत असून जुनेरा सैय्यद ही इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे. या तिघांनी कडक उन्हाळ्याची पर्वा न करता श्रद्धेने रोजा पूर्ण करत कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांचेही कौतुक मिळवले.
विशेष म्हणजे या चिमुकल्यांनी आतापर्यंत २३ रोजे झाले त्याचा हा पहिला रोजा पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. घरातील पालकांनी सांगितले की, मुलांवर रोजा ठेवण्याचा कोणताही आग्रह केला जात नाही. मुले स्वतःच्या इच्छेने आणि श्रद्धेने रोजा ठेवण्याची तयारी दाखवतात. त्यानंतर घरातील वडीलधारी मंडळी त्यांच्या आरोग्याची आणि सोयीची विशेष काळजी घेतात.
या तीन चिमुकल्यांनी ठेवलेल्या पहिल्या रोजामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून श्रद्धा, संस्कार आणि धर्मभावनेचा सुंदर संदेश समाजात पोहोचला आहे.
