ब्रेकिंग न्यूज :
भारत

देवदूत ठरले साई संस्थानचे डॉक्टर; अपघातात अडकलेल्या दाम्पत्याचे वाचवले प्राण

Blog Image
एकूण दृश्ये: 34

देवदूत ठरले साई संस्थानचे डॉक्टर; अपघातात अडकलेल्या दाम्पत्याचे वाचवले प्राण

      शिर्डी (प्रतिनिधी)

पुणे येथून येवला येथे लग्नासाठी निघालेल्या दाम्पत्यावर गुरुवारी (दि.१२) कौठे कमलेश्वर परिसरातील वळणावर भीषण अपघात जीवावर ओढावला. चालकाचा अंदाज चुकल्याने कार पलटी होऊन थेट नाल्यात कोसळली आणि पती पत्नी आत अडकून पडले. मदतीसाठी कोणीही नसताना अचानक त्या मार्गाने जाणाऱ्या एका डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि या दोघांचे प्राण वाचवले.

अपघात इतका भीषण होता की गाडी नाल्यात उलटून पडल्याने दोघांनाही बाहेर पडणे अशक्य झाले होते. त्या वेळी त्या मार्गाने जात असलेल्या डॉक्टरांनी गाडी थांबवून परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यांनी मोठ्या धाडसाने गाडीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढले, त्यांना धीर दिला आणि तात्काळ प्राथमिक उपचार केले.

----- Advertisements -----

यावरच न थांबता त्यांनी क्रेनची व्यवस्था करून अपघातग्रस्त कार बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर जखमी दाम्पत्याला स्वतःच्या गाडीत बसवून शिर्डी बसस्थानकापर्यंत सुरक्षित पोहोचवले. त्यांच्या चहा नाश्त्याचीही व्यवस्था करून पुढील प्रवासासाठी त्यांना धीर दिला.

या सर्व घटनेनंतर त्या दाम्पत्याला कळले की मदतीला धावून आलेले हे डॉक्टर म्हणजे साईबाबा संस्थान शिर्डी येथे कार्यरत असलेले इएनटी तज्ज्ञ डॉ. योगेश गेठे होते. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावामुळे भारावून गेलेल्या शिवाजी कारभारी कदम पिंपरी चिंचवड यांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना पत्र पाठवून डॉ.च्या सेवाभावाचे कौतुक केले. संकटाच्या क्षणी देवदूतासारखे धावून डॉक्टर गेठे यांनी दाखवलेल्या माणुसकीने साई संस्थानची सेवाभावी परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक