भारत

आधार केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ;

Blog Image
एकूण दृश्ये: 163

आधार केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ; खासगी कंपनीकडे काम सोपवण्याचा सरकारचा घाट; हजारो युवकांचे भविष्य अंधारात! 

{ 759 आधार संच एका झटक्यात बंद 

    मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण विभागातर्फे सुरू असलेल्या आधार नोंदणीच्या कामावर अलीकडच्या काळात गंभीर संकट ओढवले आहे. यापूर्वी महाआयटी या सरकारी कंपनीमार्फत राज्यभर हे काम सुरळीतपणे सुरू होते. विशेषतः ग्रामीण भागात हे कार्य अधिक परिणामकारकपणे सुरू होते. याच माध्यमातून गरोदर माता, बालके आणि इतर लाभार्थ्यांची आधार नोंदणी वेळेत व योग्य पद्धतीने होत होती. मात्र, अचानकपणे हे काम दुसऱ्या खासगी कंपनीकडे सोपवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्यामुळे अनेक आधार केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

 759 आधार संच एका झटक्यात बंद; आदेश कुणाचा ?

या बदलामुळे राज्यभरात 759 आधार नोंदणी संच एका दिवसात बंद करण्यात आले. हा निर्णय नेमका कोणाच्या आदेशावरून घेण्यात आला ? याचा खुलासा अद्याप सरकारी पातळीवरून करण्यात आलेला नाही. हा निर्णय अचानक घेण्यात आला असून, त्याची कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही. या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी गरोदर माता, लहान बालके, वृद्ध व्यक्ती किंवा अन्य गरजू नागरिक आधार नोंदणीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र आधार केंद्रे बंद असल्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवणे अशक्य झाले आहे.

 गरिबांचे नुकसान, चालकांचे जीवन उद्ध्वस्त

गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागात पोषण ट्रॅकरसह अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू असताना, आधार नोंदणी संच अचानक बंद करण्यात आल्याने या योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम गरोदर महिलांवर, बालकांवर, वृद्धांवर होत असून, आवश्यक लाभ मिळवण्यासाठी आधार आवश्यक असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, हजारो आधार केंद्र चालक बेरोजगार झाले आहेत. अनेकांनी स्वतःच्या घरातील बचतीतून लाखो रुपये गुंतवून मशीन, बायोमेट्रिक उपकरणे, इंटरनेट कनेक्शन, ऑफिस इत्यादी तयार केले होते. आता त्यांचा हा व्यवसायच उद्ध्वस्त झाला आहे.

----- Advertisements -----

आधार केंद्र चालकांचा सवाल : जबाबदार कोण..?759 संच बंद करण्याचा आदेश कोणाचा ? 

या निर्णयाने लाभार्थ्यांचे नुकसान आणि बेरोजगारी वाढली याला जबाबदार कोण ? स्वतःच्या फायद्यासाठी सरकारने हजारो तरुणांचे जीवन धोक्यात का घातले ? असे अनेक प्रश्न सध्या राज्यभरात गाजत असून, आधार केंद्र चालक आणि नागरिक सरकारकडून उत्तरांची अपेक्षा करत आहेत

सरकारची भूमिका अस्पष्ट; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह?

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. सरकारने महाआयटीसारख्या विश्वसनीय यंत्रणेला डावलून दुसऱ्या कंपनीकडे काम का दिले? नव्या कंपनीची निवड कोणत्या निकषावर झाली ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, सरकार या गंभीर मुद्द्याकडे लक्ष देणार का? किंबहुना ग्रामीण भागातील तरुणांच्या उपजीविकेच्या प्रश्नावर सरकार कोणते पावले उचलणार ? असा सवाल केंद्र चालक करीत आहेत.

----- Advertisements -----

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin