श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष ओझा, कार्याध्यक्ष आहिरे उपाध्यक्ष पानसरे सचिव आहेर समन्वयक मदने यांची निवड
संगमनेर प्रतिनिधी
शहरातील पत्रकारांचे एकमेव कृतिशील संघटन असलेल्या श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. आगामी वर्षासाठी झालेल्या या निवडींमध्ये संघाच्या अध्यक्षपदी नितिन ओझा, कार्याध्यक्षपदी संजय आहिरे, उपाध्यक्षपदी शेखर पानसरे, सचिवपदी सतीष आहेर तर समन्वयकपदी गोरक्षनाथ मदने यांच्यावर सर्वानुमते जबाबदारी सोपवण्यात आली. पूर्वीच्या संगमनेर पत्रकार मंच म्हणून लौकीक मिळवलेल्या या संघटनेचे दोन वर्षांपूर्वी संगमनेर श्रमिक पत्रकार संघ असे नामकरण करण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्र दिना पूर्वी संघाची बैठक घेवून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आणि वर्षभरातील उपक्रमांचे नियोजन करण्याचा संघटनेचा प्रघात आहे. त्यानुसार या बैठकीत वरीलप्रमाणे नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. विशेष म्हणजे संगमनेरच्या पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून एकसंध राहिलेली ही संघटना आहे. त्यामुळे एकमताने निवड करण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली.
मावळते अध्यक्ष मंगेश सालपे यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला. ज्येष्ठ पत्रकार सुनील नवले यांनी माध्यमं क्षेत्रात होणाऱ्या वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर आपल्यातही आवश्यक बदल करण्याची गरज व्यक्त केली. संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे कृतिशील संघटन निर्माण झाल्याने पत्रकारांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करुन पत्रकारांचे हित जोपासण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही अध्यक्ष नितिन ओझा यांनी दिली. कार्याध्यक्ष संजय आहिरे यांनी संघाने निर्माण केलेल्या मापदंडानुसार वर्षभर कामकाज करणार असल्याचे सांगत तंत्रज्ञान क्षेत्राचे ज्ञान अवगत करुन घेण्यासाठी सदस्यांसाठी लवकरच विविध विषयांचा समावेश असलेली कार्यशाळा घेण्याचा मनोदय व्यक्त केला. पत्रकार संघाने सरु केलेला 'मिट-द-प्रेस' हा उपक्रम अधिक व्यापकपणे राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार शाम तिवारी, सोमनाथ काळे, अमोल मतकर, गोरक्ष नेहे, आनंद गायकवाड, नीलिमा घाडगे, धीरज ठाकूर, अंकुश बुब, बाबासाहेब कडू, सचिन जंत्रे, काशिनाथ गोसावी, भारत रेघाटे, सुशांत पावसे, संजय साबळे आदि उपस्थित होते. नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.