भारत

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन ; अजित पवारांनी व्यक्त केला शोक

Blog Image
एकूण दृश्ये: 88

माजी आमदार अरूणकाका जगताप यांचे निधन ; अजित पवारांनी व्यक्त केला शोक ‌

 अहिल्यानगर प्रतिनिधी

शहरातील ज्येष्ठ राजकारणी, माजी नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे दोन वेळचे आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांचे 2 मे रोजी पुण्यात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. काही दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अरुणकाका जगताप यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अरुणकाका जगताप यांचे पार्थिव सारसनगर येथील राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर स्मशानभूमीत त्यांच्यावर 4 वाजता अंत्य संस्कार होणार आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अरुणकाका हे केवळ राजकारणात नव्हे तर समाजकारण, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातही सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, कन्या डॉक्टर वंदना फाटके ,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले हे त्यांचे व्याही आहेत.

अरुणकाका यांची राजकीय कारकीर्द युवक काँग्रेसपासून सुरू झाली. नगरपालिकेचे नगराध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, गुणे आयुर्वेद संस्थेचे अध्यक्ष अशा विविध भूमिकांतून त्यांनी योगदान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले होते. काकांच्या निधनामुळे अहिल्यानगरच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली*

मुंबई, "माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

----- Advertisements -----

 

 

शिक्षणाशिवाय जीवन अधू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin